झुंडशाही आणि गळे कापणे निंदनीयच ! त्यांचे समर्थन करणे शक्यच नाही. माझाही तसा हेतू अजिबात नाही; पण जे दिसते ते समोर ठेवणे क्रमप्राप्त आहे.
१. झुंडशाहीमुळे टीका करणार्याला सहानुभूती मिळते !
एखाद्याचा विचार पटला नाही की, आक्रमकतेने जाब विचारणे ही झुंडशाही ! असा आक्रस्ताळेपणा न करता केली जाणारी कृती, म्हणजे गळे कापणे. झुंडशाही केल्याने ज्याच्यामुळे ती केली जाते, त्याला सहानुभूती मिळते. उदाहरण सांगायचे, तर बजरंग दल आणि अधिवक्ता उदय भेंब्रे. इथे विचारांचा प्रतिवाद विचारांनी करावा, अशी भूमिका घेतली जाते. रात्री जाब विचारायले गेले म्हणून चुकीचे ठरतात. सहानुभूती भेंब्रेंना मिळते. ‘हेच तुम्ही काही वर्षांपूर्वी म्हणाला होतात आणि ते सचिन मदगे यांनी सप्रमाण खोडून काढले होते, मग पुन्हा का तेच म्हणालात ?’, असे कुणीही भेंब्रेंना विचारत नाही. ‘चुकीचे सिद्ध करूनही तुम्ही तेच का रेटता ?’, असेही कुणी विचारत नाही. मागे घेतलेले ‘ब्रह्मास्त्र’ बाहेर काढण्यावर कुणी शंका घेत नाही.
२. गळे कापणार्यांविषयी
गळे कापल्याने ज्याच्यामुळे गळे कापले गेले, तो दोषी धरला जातो. राजस्थानमधील कन्हैय्यालाल शिंप्याचा गळा कापला, तेव्हा न्यायाधीश म्हणाले, ‘यासाठी नुपूर शर्मा कारणीभूत.’ विचारांचा प्रतिवाद विचारांनी करावा, असे होत नाही. ‘गळे कापणार्यांना शिक्षा होईल’, असे म्हटले जाते. सरकार कुणाचे आहे, याची निश्चिती करून कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे कि नाही ? हे ठरवले जाते.
३. अंत:प्रवाह निर्माण करून क्षमा मागायला लावणे
तिसरा प्रकार घडतो तो म्हणजे अंत:प्रवाह (अंडरकरंट). झुंडशाही होत नाही किंवा गळेही कापत नाहीत. अंत:प्रवाह असा प्रवाहित केला जातो (कळ अशी फिरवली जाते) की, जो बोलतो तो आपणहून स्वत:च, कुणीही न सांगता स्वत:चे म्हणणे मागे घेतो. दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘असंतांचे संत’ हा अग्रलेख दुसर्याच दिवशी मागे घेतला, तोही पहिल्या पानावर बिनशर्त माफी मागून ! एरव्ही ‘भावना दुखावल्या गेल्या असल्यास’ असे शब्द असतात माफीत; पण या माफीत ‘भावना दुखावल्यामुळे’ अशी थेट क्षमा होती. कुठून चावी, कळ फिरली होती, वेगळे सांगायला नको.
४. कथित विचारवंत कशी भूमिका घेतात ते महत्त्वाचे !
भावना दुखावल्यावर व्यक्त होण्याचे वरील प्रकार आणि भूमिका विचारवंतांना ठाऊक आहे; म्हणून झुंडीने विरोध झाल्यास ते स्वतःच्या विचारांचा विजय मानतात. अंत:प्रवाह जाणवल्यास वाच्यता न करता माघार घेतात. गळा कापला जाण्याची खात्री असेल, तिथे गळाच काढत नाहीत.
– श्री. प्रसन्न बर्वे, पणजी, गोवा. (३.३.२०२५)