‘इतिहासकारांच्या माहितीच्या आधारे औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हटले !’ – समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी

  • समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे निलाजरे विधान

  • विधीमंडळाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी वक्तव्य मागे घेतल्याचे दिले कारण !

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी

मुंबई – माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी कुणाचाही अपमान केलेला नाही. (छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत क्रौर्याने हत्या करणार्‍या औरंगजेबाचा उदो उदो हा छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह ११० कोटी हिंदु जनतेचा घोर अपमानच आहे ! – संपादक) छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज या सर्व महान पुरुषांचा मी आदर करतो. सर्वांनी त्यांचा आदर करायला हवा. त्यांना आदर्श मानून वाटचाल करायला हवी. मी औरंगजेबाविषयी जे वक्तव्य केले, ते इतिहासकारांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर केले होते; पण त्या वक्तव्यामुळे विधानसभेचे कामकाज तहकूब व्हायला नको होते. विधीमंडळात आपल्याला पुष्कळ कामे करायची आहेत. जनतेची कामे प्रलंबित आहेत. विधीमंडळाचे कामकाज सुरळीत व्हावे, यासाठी मी माझे वक्तव्य मागे घेतो, असे निलाजरे विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले. त्यांनी ‘औरंगजेब हा उत्तम प्रशासक आहे’, असे विधान केले होते. त्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली आणि राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही गदरोळ झाला अन् कामकाज तहकूब करण्यात आले.

संपादकीय भूमिका

‘चोर तर चोर, वर शिरजोर’ ही आमदार अबू आझमी यांची जुनी वृत्ती आहे; परंतु त्यांच्यावर कधीच कोणत्याच सरकारने प्रभावी कारवाई न केल्याने ते अशा प्रकारे बेताल वक्तव्ये करत सुटतात. अशांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्यासह औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत.