रेल्वेच्या बाजूच्या गवताला आग !
आंबिवली – मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आंबिवली – टिटवाळा स्थानकादरम्यान रेल्वेच्या कडेला असलेल्या गवताला आग लागली. सुरक्षेच्या दृष्टीने म्हणून लोकल काही वेळ थांबवण्यात आली. त्यामुळे अनेक लोकलच्या एकामागोमाग रांगा लागल्या. कामावरून घरी परतणार्या लोकांना याचा फटका बसला.
मुंबईत उष्णतेत वाढ !
मुंबई – मुंबईत सध्या ३८ अंश सेल्सिअस तापमान आहे. फेब्रुवारी मासातच उष्णतेची तीव्रता वाढली आहे. उष्णतेच्या लाटांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्रात मार्च आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटांची संख्या अन् तीव्रता अधिक रहाणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिचे ‘एक्स’ खाते हॅक !
मुंबई – प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिचे ‘एक्स’ खाते हॅक झाले आहे. ही माहिती तिने तिच्या ‘इंस्टाग्राम’वरून दिली. ती म्हणाली, ‘‘मी ‘एक्स’शी संपर्क केला; पण मला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. मी माझे खाते पुसून टाकू (डिलीट) शकत नाही किंवा मी ‘लॉग इन’ही करू शकत नाही. जर खाते परत मिळाले आणि सुरक्षित झाले, तर मी स्वतः माहिती देईन.’’
रायगडावरील रोपवे ३ ते ७ मार्च बंद
रायगड – रायगडावरील रोपवे तांत्रिक देखभाल-दुरुस्तीसाठी ३ ते ७ मार्च या कालावधीत बंद असेल. पर्यटक आणि शिवभक्त यांची गैरसोय होऊ नये, यासाठी ही आगाऊ सूचना काढण्यात आल्याचे रोपवेचे दायित्व असलेले राजेंद्र खातू यांनी प्रसिद्धपत्रकात स्पष्ट केले.
रस्त्यावरील सांडपाण्याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष !
पालघर – येथील काही ठिकाणचे सांडपाणी थेट रस्त्यावर येत आहे. त्यामुळे नागरिकांना त्यातूनच चालत जावे लागत आहे. या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. याकडे नगरपालिका आणि बांधकाम व्यावसायिक यांनी दुर्लक्ष केले आहे.
संपादकीय भूमिका : रस्त्यावरील सांडपाण्याच्या समस्येकडे कानाडोळा करणे हा नगरपालिकेचा अक्षम्य निष्काळजीपणाच होय !
‘छावा’ चित्रपटाची कमाई ४०० कोटी रुपयांच्या घरात !
मुंबई – छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘छावा’ चित्रपटाने आतापर्यंत ४०० कोटी रुपये कमाई केली आहे. वर्ष २०२५ मध्ये ४०० कोटी रुपयांची कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट आहे. येत्या काळात हा चित्रपट ५०० कोटी रुपयांचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची, तर अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे.