सहस्रो जिज्ञासूंनी दिली सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

पुणे, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – महाशिवरात्रीला संपूर्ण पुणे जिल्ह्यात विविध प्रकारे धर्मप्रसार करण्यात आला. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन, ग्रंथप्रदर्शन, फ्लेक्स प्रदर्शन, फलक लेखन, प्रत्यक्ष आणि ‘ऑनलाईन’ व्याख्याने, भित्तीपत्रके लावणे आदी माध्यमांतून व्यापक स्तरावर धर्मप्रसार करण्यात आला. पुणे शहरात २२ ठिकाणी, तर पिंपरी-चिंचवड येथे २५ ठिकाणी ग्रंथप्रदर्शने आणि सात्त्विक उत्पादने यांचे कक्ष उभारण्यात आले होते. या कक्षास भाविक-जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

अनेक जिज्ञासूंनी सनातन संस्थेचे कार्य जाणून घेतले. शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी ? भगवान शिवाची उपासना कशी करावी ? शिवपिंडीवर बेल किती आणि कसा वहावा ? याविषयी फलक लेखनाच्या माध्यमातून धर्मशिक्षण देण्यात आले. सर्व उपक्रम यशस्वी होण्यासाठी धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी सक्रीय सहभाग घेतला. कक्षावर अध्यात्मविषयक ग्रंथांसह राष्ट्र, धर्म, आयुर्वेद, बालसंस्कार आदी विविध विषयांवरील ग्रंथसंपदाही उपलब्ध करण्यात आली होती. सनातन निर्मित पूजोपयोगी असलेल्या सात्त्विक उत्पादनांचा लाभही सहस्रो जिज्ञासूंनी घेतला. ग्रंथप्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादनांच्या कक्षावर विविध मान्यवरांनी भेटी दिल्या.


विशेष
भोर, नसरापूर येथील श्री बनेश्वर महादेव मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाविकांना पाणीवाटप करण्यात आले, तसेच भित्तीपत्रके आणि फ्लेक्सच्या माध्यमातून धर्मशिक्षण प्रसार करण्यात आला. त्याला भाविक आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.