मंचर येथील महिलेला भूसंपादित भूमीचा मोबदला न दिल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे साहित्य जप्त !

जिल्हा न्यायालयाची कारवाई

शेतकर्‍यांच्या भूमीचे संपादन

मंचर – पुणे नाशिक महामार्गावर बाह्यवळणासाठी १०० शेतकर्‍यांच्या भूमीचे संपादन अल्प मोबदला देऊन करण्यात आले. याविरोधात निघोटवाडी (ता-आंबेगाव) येशील सीमा लेंडवे या महिलेने जिल्हा न्यायालयात पोतनीस अधिवक्त्यांच्या वतीने दावा प्रविष्ट केला होता. या प्रकरणी भूसंपादित भूमीचा वाढीव मोबदला (१ कोटी ३९ लाख ८४ सहस्र) महिलेला मिळावा, असा निकाल जिल्हा न्यायालयाने ३० ऑगस्ट २०२२ या दिवशी दिला; परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे जिल्हा न्यायाधीश के.पी. क्षीरसागर यांनी जप्तीची कार्यवाही करण्याचा आदेश २३ ऑक्टोबर २०२४ ला दिला.

न्यायालयाचे बेलिफ (कायदेशीर संरक्षक) आणि लेंडवे यांनी २१ फेब्रुवारी या दिवशी महामार्गाच्या कार्यालयात जप्ती वॉरंट बजावले. या वेळी अधिकार्‍यांना खोटी आश्वासने देत पैसे लवकरात लवकर न्यायालयात जमा करतो, असे सांगितले. त्यामुळे बेलिफच्या वतीने लेंडवे यांनी संचालकांच्या खुर्चीसह अन्य साहित्य जप्त केले.