‘२५.१.२०२५ या दिवशी मडगाव, गोवा येथील श्रीमती भारती मंगेश प्रभु (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांचे निधन झाले. २०.२.२०२५ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. सौ. वृंदा बापट ((कै.) श्रीमती भारती प्रभु यांची लहान मुलगी), फोंडा, गोवा.
१ अ. मुलींवर चांगले संस्कार करणे
१. आईने आम्हाला (मी आणि माझी मोठी बहीण आताच्या कै. (सौ.) स्वाती जोशी) आमच्या लहानपणीच श्रीरामाचा आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करायला शिकवले. आम्ही मोठ्या झाल्यावर तिने आम्हाला पोथ्या वाचायला शिकवल्या. आईने आम्हाला घरातील उंबरठ्यावर रांगोळी काढणे, तुळशीला पाणी घालणे इत्यादी शिकवले.
२. ती आम्हाला देवाची भक्ती करण्याविषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगत असे.
३. आईमुळे माझ्या शेजारी रहाणार्या मैत्रिणीनेही माझ्यासारखी पोथी वाचणे चालू केले होते.
४. आईने आम्हाला चांगली शिस्त लावली. तिने आम्हाला विवाहाआधी आणि नंतरही सर्वकाही शिकवले. तिने आम्हाला कधीही बाहेरचे खाऊ घातले नाही. ती सर्व पदार्थ घरीच बनवत असे.
१ आ. स्वच्छतेची आवड : तिला स्वच्छता करायला पुष्कळ आवडत असे. ती घरातील हंडा, बालद्या आणि कळशा नेहमी पाण्याने भरून ठेवत असे.
१ इ. प्रेमभाव : आमच्या दारात भिकार्यांची लहान मुले यायची. आई त्यांना पाणी, जेवण, कपडे इत्यादी देत असे. घरी दुपारच्या वेळी भिकारी किंवा हमाल आले, तर आई त्यांना चादर, टॉवेल असे काहीतरी देत असे. ती नेहमी सगळ्यांना काही ना काही द्यायची. ती आम्हाला सांगत असे, ‘‘देवाने आपल्याला पुष्कळ दिले आहे.’’
१ ई. आजारपणात घरगुती औषधे देणे आणि आध्यात्मिक उपाय करणे : आम्ही मुले रुग्णाईत झाल्यास आई आम्हाला घरगुती औषधे देत असे आणि आमच्यासाठी आध्यात्मिक उपायही करत असे. ती स्तोत्रे आणि शिवकवच म्हणणे, शिवकवच म्हणत असतांनाची विभूती आम्हाला लावणे आणि विभूती घातलेले पाणी प्यायला देणे, असे उपाय करत असे. त्यामुळे आम्हाला बरे वाटत असे.
१ उ. मुलांकडून कसलीही अपेक्षा न करता त्यांना साधना करण्यास साहाय्य करणे : माझा भाऊ (श्री. गुरुराज, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४९ वर्षे) १८ वर्षांचा असतांना शिक्षणासाठी बाहेरगावी गेला. त्याचे शिक्षण झाल्यानंतर तो सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ राहून साधना करू लागला. तेव्हा माझ्या आई-वडिलांनी त्याला ‘तू साधना सोडून नोकरी कर आणि घर सांभाळ’, असे कधीही सांगितले नाही. आई सर्वांना सांगत असे, ‘‘गुरुराज प.पू. गुरुदेवांच्या चरणांजवळ आहे. मला त्याची काहीही काळजी नाही.’’
१ ऊ. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करून आनंदी रहाणे : आईने सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यावर तिच्यामध्ये पुष्कळ पालट झाले. ती म्हणायची, ‘‘प.पू. गुरुदेव हळूहळू मला मायेतून बाहेर काढत आहेत.’’ ती नेहमी आनंदी असायची. तिची विचारपूस केल्यावर ‘मी बरी आहे’, असे ती सांगत असे. तिच्या शेवटच्या आजारपणातही ती असेच सांगत होती.
१ ए. ‘स्वतःचे घर सनातनचे सेवाकेंद्र आहे’, असा भाव ठेवून सेवा करणे
१. तिने सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यापासून ती म्हणत असे, ‘‘हे घर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आहे. प.पू. गुरुदेवांचे हे घर साधकांसाठी २४ घंटे उघडे आहे.’’ तेव्हा आमचेे घर म्हणजे सनातनचे एक लहानसे सेवाकेंद्रच होते.
२. आमच्या घरी रात्री-अपरात्री साधक येत असत. आई त्यांना खायला देणे आणि जेवण करून वाढणे, अशी सेवा करत असे.
३. नेसाई येथे सेवाकेंद्र चालू झाल्यावर आरंभी तिथे फारशी भांडी नव्हती. तेव्हा साधक सेवाकेंद्रासाठी आमच्या घरून भांडी नेत असत. त्या वेळी आईने स्वतःकडील अधिक असलेली भांडी सेवाकेंद्रासाठी दिली.
४. आमच्या घरी सत्संग होत असत. त्या दिवशी आई पुष्कळ आनंदी असे. ती घरी येणार्या साधकांच्या बसण्याची सोय करणे, त्यांना धने-जिर्याचे पाणी बनवून ठेवणे, साधकांना खायला देणे, असे करत असे.
१ ऐ. गुरूंप्रती भाव : प.पू. गुरुदेव ४ वेळा आईच्या घरी येऊन गेले आहेत. ‘प.पू. गुरुदेवांची कृपा घरावर आहे; म्हणून आपण आनंदात आहोत’, असे आई सांगत असे. ती प्रत्येक साधकामध्ये प.पू. गुरुदेवांचे रूप पहात असे. ती म्हणायची, ‘‘घरात येणारा प्रत्येक साधक म्हणजे प.पू. गुरुदेवांचे रूप आहे. साधकांच्या माध्यमातून गुुरु घरी येतात. मला प.पू. गुरुदेवांचे प्रतिदिन दर्शन होते.’’
२. श्री. सदानंद जोशी (कै. (श्रीमती) भारती प्रभु यांचे मोठे जावई),फोंडा, गोवा.
अ. ‘आई (सासूबाई) पुष्कळ प्रेमळ होत्या.
आ. त्या सुगरण होत्या. त्यांनी पुष्कळ अन्नदान केले.
इ. त्यांच्या घरी गेलेली व्यक्ती कधीच विन्मुख परत गेली नाही. त्या गरीब-श्रीमंत, नातेवाईक, साधक या सर्वांना प्रेमाने खाऊ घालत असत. आईंची आर्थिक स्थिती बेताची असूनही त्यांनी चौकटीच्या बाहेर जाऊन घरी येणार्या व्यक्तींचे आदरातिथ्य केले आहे.
ई. त्या अल्प वेळेत दुसर्याशी जवळीक साधत असत.’
३. सौ. श्रेया प्रभु (कै. (श्रीमती) भारती प्रभु यांची धाकटी सून, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४८ वर्षे), वाराणसी, उत्तरप्रदेश
अ. ‘माझी प्रकृती बरी नसल्यास त्या माझी आईच्या मायेने काळजी घेत.
आ. त्यांनी त्यांच्या मुली आणि सुना यांमध्ये कधीही भेद केला नाही.
इ. मी त्यांना वाद घालतांना पाहिले नाही. एकदा मी त्यांना विचारले, ‘‘आई, तुम्हाला कुणी काही बोलले, तर राग कसा येत नाही ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘आपल्याला कुणी बोलले, तरीही आपण ते स्वतःला लावून घ्यायचे नाही, म्हणजे काही वाटत नाही.’’
४. सौ. सुषमा कुलकर्णी (कै. (श्रीमती) भारती प्रभु यांची विहीण, वय ७२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
अ. ‘प्रभुआजींनी त्यांच्या सुनांना साधना करण्याची पूर्णपणे मोकळीक दिली होती. त्यांनी सुनांकडून कसल्याही अपेक्षा केल्या नाहीत.’
५. श्री. नीलेश कुलकर्णी आणि सौ. गौरी कुलकर्णी (कै. (श्रीमती) भारती प्रभु यांच्या धाकट्या सुनेचा भाऊ आणि भावजय), फोंडा, गोवा.
३ अ. प्रेमभाव : ‘प्रभुआजी घरी येणार्या प्रत्येक व्यक्तीला खाऊ देत असत. काही मासांपूर्वी त्या रुग्णाईत असतांना आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा त्यांनी आमच्या नकळत आम्हाला चहा करून दिला.
३ आ. गुरूंप्रती भाव : प्रभुआजींशी बोलतांना त्यांचा सच्चिद़ानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव लक्षात येत असे. आम्ही गुरुदेवांचे नाव उच्चारले, तरीही प्रभुआजींचे हात आपोआप जोडले जात असत.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ४.२.२०२५)