‘आज माघ कृष्ण सप्तमी (२०.२.२०२५) या दिवशी ‘पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास (रघुवीर) महाराज यांचा वाढदिवस आहे. प.पू. दास महाराज यांनी हिंदु जनजागृती समितीचे कराड येथील श्री. मदन सावंत यांना केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.
प.पू. दास (रघुवीर) महाराज यांच्या चरणी ८२ व्या वाढदिवसानिमित्त सर्व साधकांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. प्रवासातही साधनारत असणारे प.पू. दास (रघुवीर) महाराज !
‘प.पू. दास महाराज सध्या गौतमारण्य आश्रम, राममंदिर, बांदा येथे वास्तव्याला आहेत. मी प.पू. दास महाराज यांच्याकडे अधूनमधून जातो. एक दिवस प.पू. दास महाराज मला म्हणाले, ‘‘आपल्याला पूू. सौरभ जोशी (सनातनचे ३२ वे (व्यष्टी) संत, वय २८ वर्षे) यांना भेटायला जायचे आहे.’’ आम्ही भेटायला निघतांना वाटेत वाचण्यासाठी प.पू. बाबांनी (प.पू. दास महाराज यांनी) ‘मारुतिस्तोत्र आणि भवानी स्तोत्र’ हे ग्रंथ समवेत घेतले. प्रवास चालू झाल्यापासून पू. सौरभदादा यांच्या निवासस्थानी जाईपर्यंत प.पू. बाबांनी आपले वाचन पूर्ण केले. त्यानंतर तेथून परत बांद्याला येईपर्यंत त्यांनी वाचन चालू ठेवले. या वेळी आमच्यात झालेला संवाद पुढे दिला आहे.

१ आ. नामातील आनंदाची गोडी लागल्यावर सर्व बाह्य परिस्थिती आणि सुखे निरर्थक वाटतात ! – प.पू. दास महाराज
श्री. मदन सावंत : प.पू. दास महाराज, तुम्ही प्रवासात बाहेरचा निसर्ग बघू शकला असता किंवा आमचे बोलणे ऐकू शकला असता; परंतु तुम्ही तसे केले नाही. तुम्ही तुमचे वाचन पूर्ण केले.
प.पू. दास महाराज : भक्ती आणि नाम यांमध्ये जो आनंद आहे, तो या बाह्य गोष्टींमध्ये नाही. एकदा त्या आनंदाची तुम्हाला गोडी लागली की, तुम्हाला सर्व बाह्य परिस्थिती आणि सुखे निरर्थक वाटतात.
२. नामजप पूर्ण केल्यावरच विश्रांती घेणारे प.पू. दास महाराज !
प.पू. दास महाराज त्यांचा ठरलेला नामजप पूर्ण केल्यावरच विश्रांती घेतात. एकदा रात्री अडीच वाजले, तरी प.पू. महाराज विश्रांती न घेता नामजप करत बसले होते. तेव्हा आमच्यात झालेला संवाद पुढे दिला आहे.
२ अ. गुरूंच्या आज्ञापालनाचे महत्त्व !
श्री. मदन सावंत : प.पू. महाराज, तुम्ही आता विश्रांती घ्या. राहिलेला नामजप उद्या करू शकता ना ?
प.पू. दास महाराज : नाही. मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) तसा शब्द दिला आहे. मला नामजप पूर्ण केल्याविना झोपच येत नाही. मी त्यांच्या आज्ञेचे पूर्णतः पालन करतो. मी आज्ञापालन करत असतांना माझा देह जरी नष्ट झाला, तरी मला त्याची चिंता वाटणार नाही.
३. अयोध्या येथे (२२.१.२०२४ या दिवशी) श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर माझे प.पू. दास महाराज यांच्याशी झालेले संभाषण
३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले अयोध्या येथील सोहळ्याला निश्चितच उपस्थित असतील, केवळ स्थूल दृष्टीला ते दिसले नाहीत !
श्री. मदन सावंत : प.पू. डॉक्टरांची प्रकृती चांगली असती, तर तेही अयोध्या येथील सोहळ्याला उपस्थित राहिले असते.
प.पू. दास महाराज : ‘प.पू. डॉक्टर अयोध्येला गेले नाहीत’, असे होणार नाही. एवढा मोठा श्रीरामाच्या मूर्तीस्थापनेचा सोहळा होता, तर ते तिथे गेले होते. प.पू. डॉक्टरांनी यापूर्वी सांगून ठेवले आहे, ‘स्थूल देहा असे स्थळकाळाची मर्यादा । कैसे असू सर्वदा सर्वा ठायी ॥ सनातन धर्म माझे नित्य रूप । त्या रूपे सर्वत्र आहे सदा ॥’
२० वर्षांपूर्वी ‘सनातन’ हा शब्दही उच्चारण्यासाठी लोक घाबरत होते. आता हिंदु धर्माचे जे काही कार्य आहे, त्याला ‘सनातन’ असे म्हटले जाते. त्या ‘सनातन’ शब्दाने सर्व प्रकारच्या धर्मकार्याची चर्चा सर्वत्र होत आहे. या श्रीराममंदिराच्या स्थापनेलासुद्धा विरोधकांनी ‘सनातनी’ असे म्हणून हिणवले. श्रीराममंदिराचा सोहळा हा सनातनी असेल, तर त्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले अवश्य उपस्थितीत असतील. केवळ आपल्या स्थूल दृष्टीला त्यांचे दर्शन झाले नाही.
४. प.पू. दास महाराज यांनी सनातन संस्थेत साधक राबवत असलेल्या स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या प्रक्रियेचे सांगितलेले महत्त्व
श्री. मदन सावंत : आम्हा साधकांमध्ये पुष्कळ स्वभावदोष आहेत, तर आमची साधना कशी होणार ?
प.पू. दास महाराज : बाह्य जग आणि सनातन संस्था यांत भेद आहे. सनातन संस्था हा आरसा आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे खरे रूप दिसते. या आरशामध्ये आपला जो चेहरा दिसतो, त्यावर जर मळ असेल, तर चेहरा स्वच्छ केला जातो. बाह्य जगामध्ये जर आपला चेहरा चांगला दिसत नसेल, तर त्यावर रंगभूषा (मेकअप) करतात, म्हणजे चेहर्यावर कवच घालतात किंवा आरशाला दोष देतात. सनातन संस्थेमध्ये तसे नाही. तुमचा खरा चेहरा आहे, तसाच दिसतो. त्यावर जे ओरखडे म्हणजे स्वभावदोष आहेत, ते सर्व काढून टाकण्यासाठी साधकांकडून प्रयत्न केले जातात. त्यासाठीच साधकांकडून स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाची प्रक्रिया राबवून घेतली जाते. त्यातून साधक तावून सुलाखूनच बाहेर पडतो.
५. प.पू. डॉक्टर आणि त्यांच्यासारखे काही संत हे हिंदूंचा विचार करत आहेत !
प.पू. डॉक्टर हे विश्वाची चिंता करत आहेत. त्यांचे ध्येय आहे, ‘जगातील सर्व हिंदू सुरक्षित आणि सुखी व्हायला हवेत.’ तोपर्यंत ते सुखाची झोप घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांची झोप आता न्यून झालेली आहे. केवळ ‘प.पू. डॉक्टर आणि त्यांच्यासारखे काही संत’, हे हिंदूंचा विचार करत आहेत.
६. प.प. श्रीधरस्वामी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले या दोन्ही गुरूंची रूपे आठवून त्यांच्याशी संवाद साधणारेे प.पू. दास महाराज !
श्री. मदन सावंत : तुम्ही तुमचे गुरु प.प. श्रीधरस्वामी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव कसा ठेवता ?
प.पू. दास महाराज : मी प.प. श्रीधरस्वामी आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या साक्षीने प्रत्येक क्षण जगतो. सकाळचा प्रसाद, दुपार आणि रात्रीचा महाप्रसाद अन् औषधे मी त्यांच्या चरणी अर्पण केल्याविना ग्रहण करत नाही. माझी इच्छा झाली की, मी डोळे बंद करून त्यांच्याशी संवाद साधतो आणि त्यांचे रूप आठवतो. त्यामुळे मला अखंड नाम आणि साधना यांमध्ये रहाण्याचा आनंद मिळतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने माझा पुनर्जन्म झालेला आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलेली साधना करण्यासाठीच मी आता जिवंत आहे.
मला जे काही अतिरिक्त आयुष्य मिळाले आहे, ते आयुष्य मी साधना करूनच सत्कारणी लावणार आहे. त्यामुळे मला आता कुठल्याही बाह्य गोष्टींचे आकर्षण उरलेले नाही. मी आता उरलो कृतज्ञता व्यक्त करण्यापुरता ! माझे यापुढील आयुष्य मी माझे गुरु प.प. श्रीधरस्वामी आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या चरणी कृतज्ञताभाव ठेवूनच जगणार आहे.’
– श्री. मदन तानाजी सावंत, मलकापूर, कराड. (१३.२.२०२५)