कुंभमेळ्याचा उल्लेख आढळतो वेद, पुराणे आणि महाभारत यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये !

बादशाह अकबराने कुंभमेळा चालू केलेला नाही !

प्रयागराज येथे महाकुंभमेळा चालू झाला आणि आतापर्यंत ४२ कोटींहून अधिक भाविकांनी अमृतस्नान केले. कुंभमेळा हा भारताचा प्राचीन गौरव आहे. सहस्रो वर्षांपासून कुंभमेळ्याचा इतिहास आहे; परंतु काही कथित बुद्धीजीवी खोटी माहिती सांगून कुंभमेळा बादशाह अकबराने चालू केल्याचे सांगतात. खरे तर कुंभमेळा बादशाह अकबराच्या आधीपासून चालू असल्याचे अनेक प्रमाण आहेत, तरीही भारताच्या इतिहासात मोडतोड करून हिंदु धर्माला कलंकित करण्यासाठी काही समाजकंटक प्रयत्न करत असतात.

१. महाकुंभमेळ्याचा उगम 

भारतीय संस्कृती आणि समाजजीवन यांचा कुंभमेळा हा अविभाज्य घटक आहे. केवळ धार्मिक कारणांसाठी नव्हे, तर सामाजिक, आर्थिक, साहित्य, वैचारिक विश्वासाठी कुंभमेळा हे मंथनाचे ठिकाण होते. म्हणूनच त्याला तसा पुराणकथांचाही आधार मिळतो. याचा उगम समुद्रमंथनाच्या (क्षीरसागर मंथन) पौराणिक घटनेशी संबंधित मानला जातो.

देव आणि दैत्य यांनी अमृत (अमरत्व देणारे अमृत) मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले. अमृत कलश (कुंभ) मिळाल्यानंतर देव आणि दैत्य यांच्यामध्ये अमृत वाटण्यासाठी संघर्ष झाला. या संघर्षात अमृताचा कुंभ ज्या ४ स्थानांवर पडला, ती ठिकाणे म्हणजेच प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक होते. या ठिकाणी अमृताच्या थेंबांनी नद्यांना पवित्र केले असल्याचे मानले जाते, त्या ठिकाणी महाकुंभ साजरा केला जातो.

२. ऐतिहासिक संदर्भ 

केवळ पौराणिक नव्हे, तर कुंभमेळ्याचे ऐतिहासिक संदर्भ आढळतात. महाराष्ट्रात संत साहित्यातील अनेक अभंगात कुंभमेळ्याचा उल्लेख आहे, तसेच परदेशातून आलेल्या लोकांनीही प्रवासवर्णने लिहून ठेवली आहेत.

अ. प्राचीन काळातील उल्लेख : महाभारतात आणि वायुपुराणात महाकुंभाचा उल्लेख सापडतो. चिनी प्रवासी व्हेनसांगने (७ व्या शतकात) आपल्या प्रवासवर्णनात हरिद्वारच्या कुंभमेळ्याचा उल्लेख केला आहे.

आ. मध्ययुगीन काळ : मोगल काळातही कुंभमेळा चालू होता, जरी त्यावर काही मर्यादा होत्या. १९ व्या शतकात ब्रिटीश काळात कुंभमेळ्याचे व्यवस्थापन अधिक औपचारिक बनले.

इ. आधुनिक काळ : महाकुंभ हा आता धार्मिक सोहळ्याच्या पलीकडे एक जागतिक आकर्षण बनला आहे, जिथे लाखो लोक एकत्र येतात.

ई. वायुपुराणाचा कालखंड :

ई १. वैदिक काळानंतर : वायुपुराणाचा प्रारंभ वैदिक कालानंतर (अनुमाने इसवी सनपूर्व ५०० पूर्वी) झाला असल्याचे मानले जाते.

ई २. गुप्तकालीन प्रभाव : काही विद्वानांचा असा अंदाज आहे की, वायुपुराणाचा लिखित रूप गुप्त काळ (अनुमाने इसवी सनपूर्व ३०० ते ५००) पूर्ण झाला. या कालखंडात अनेक पुराणांचे लेखन आणि संकलन करण्यात आले. यांपैकी कोणतेही दाखले मानले, तरी बादशाह अकबराच्या पूर्वीचे दाखले आहेत.

उ. हरिद्वार आणि कुंभमेळा यांचा उल्लेख : व्हेनसांगच्या प्रवासवर्णनात (ज्याला ‘ग्रेट टँग रेकॉर्ड् ऑन द वेस्टर्न रिजन्स’ म्हणतात) हरिद्वारचा उल्लेख सापडतो. त्याने भारतातील धार्मिक मेळ्यांचे वर्णन करतांना गंगा नदीच्या तीरावर होणार्‍या महोत्सवांचा उल्लेख केला आहे. विद्वानांच्या मते हा उल्लेख हरिद्वारमधील कुंभमेळ्याशी संबंधित असू शकतो.

३. प्रमुख मुद्दे 

अ. गंगा नदीची पवित्रता : व्हेनसांगने गंगा नदीला हिंदूंसाठी पवित्र मानले असल्याचा उल्लेख केला आहे. त्याने नमूद केले आहे की, सहस्रो लोक गंगा नदीत स्नान करण्यासाठी एकत्र येतात; कारण त्यांना पापक्षालन आणि मोक्षप्राप्ती यांची आशा असते.

आ. धार्मिक मेळावे : हरिद्वार येथे सहस्रो भक्तांचा मेळा भरतो, जिथे विविध साधू, योगी, आणि भक्त एकत्र येतात. या मेळ्यांचा उद्देश धार्मिक विधी, स्नान आणि दान यांसाठी असल्याचे व्हेनसांग यांनी लिहिले आहे.

इ. हरिद्वारचा उल्लेख : हरिद्वारचे प्राचीन नाव ‘मयुरासन’ किंवा ‘गंगाद्वार’ म्हणून ओळखले जात असे आणि व्हेनसांगने याच ठिकाणाचा संदर्भ दिला असावा.

ई. ग्रह-नक्षत्रांशी संबंधित उत्सव : व्हेनसांगने उल्लेख केला आहे की, हिंदु धर्मात ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार काही महत्त्वाचे धार्मिक सोहळे साजरे केले जातात. विद्वानांचे मत आहे की, व्हेनसांगने दिलेला हा संदर्भ कुंभमेळ्यासाठी लागू होतो.

४. कुंभमेळा : हिंदु धर्माच्याधार्मिक परंपरेत खोलवर रुजलेला ! 

कुंभमेळा बादशाह अकबराने (अकबराचा काळ वर्ष १५५६ ते १६०५) चालू केला नाही. कुंभमेळ्याचा उगम हिंदु धर्मातील प्राचीन धार्मिक परंपरांशी संबंधित आहे आणि तो सहस्रो वर्षांपासून चालत आलेला आहे. कुंभमेळ्याचा उल्लेख वेद, पुराणे (विशेषतः वायुपुराण) आणि महाभारत यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये सापडतो. त्यामुळे कुंभमेळा हा हिंदु धर्माच्या धार्मिक परंपरेत खोलवर रुजलेला आहे.

(साभार : विश्व संवाद केंद्र)

संपादकीय भूमिका

‘बादशाह अकबराने कुंभमेळा चालू केला’, या खोट्या कथानकामागील हिंदुविरोधी षड्यंत्र वेळीच मोडून काढा !