श्रीलंकेत एका माकडामुळे देशाचा वीजपुरवठा ३ घंटे खंडित !

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेत चक्क एका माकडामुळे संपूर्ण देश अंधारात गेल्याचा प्रकार ९ फेब्रुवारीला घडला. श्रीलंकेच्या सेंट्रल पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाल्यामुळे श्रीलंकेत बहुतांश भागात अंधार झाला. जवळपास ३ घंटे हा खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत् करण्यासाठी श्रीलंकेतील प्रशासनाला प्रयत्न करावे लागले. श्रीलंकेचे ऊर्जा मंत्री कुमारा जयकोडी यांनी सांगितले की, एक माकड उड्या मारता मारता सेंट्रल पॉवर ग्रीडच्या ट्रान्सफॉर्मरच्या संपर्कात आले आणि वीज पुरवठ्यात असमतोल निर्माण झाला. परिणामी वीजपुरवठ्याची केंद्रीय यंत्रणाच बाधित झाल्यामुळे देशाच्या जवळपास सर्वच भागांत वीजपुरवठा खंडित झाला.