Anna Hazare on Delhi Election Result : अरविंद केजरीवाल यांचे विचार आणि चारित्र्य शुद्ध नसल्याने पराभव झाला ! – अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

देहली विधानसभेचा निकाल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

मुंबई – अरविंद केजरीवाल यांचे विचार आणि चारित्र्य शुद्ध नाही; म्हणूनच पराभव झाला. त्यांचे जीवन निष्कलंक नव्हते. मतदारांचा विश्‍वास नव्हता की, हे आमच्यासाठी काही करतील. मी त्यांना वारंवार सांगितले; मात्र त्यांनी ऐकले नाही, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले. देहली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी असे मत व्यक्त केले.

अण्णा हजारे पुढे म्हणाले की,

१. देहलीत मद्याच्या ठेक्यांच्या माध्यमातून जो आर्थिक घोटाळा झाला, त्यामुळे ते अपकीर्त झाले. एकीकडे अरविंद केजरीवाल लोकांच्या चारित्र्याविषयी बोलतात; मात्र दुसरीकडे दारू ठेक्यांमधे घोटाळे करतात, असे लोकांना वाटत आहे.

२. अरविंद केजरीवाल माझ्या समवेत होते, तेव्हा त्यांचा हेतू स्वच्छ होता. त्यांच्याकडे सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टीकोन होता. तेव्हा मला वाटले की, तो एक चांगला कार्यकर्ता आहे; मात्र कालांतराने मला समजले की, अरविंद केजरीवाल स्वार्थी आहेत, या स्वार्थी लोकांपासून जनतेने सावध रहावे.

३. निवडणूक लढवतांना उमेदवाराचे आचरण शुद्ध असणे, विचार शुद्ध असणे, निष्कलंक जीवन आणि त्याग असणे महत्त्वाचे आहे. जर एखाद्या उमेदवारात हे गुण असतील, तर मतदारांना त्याच्यावर विश्‍वास असतो. मी त्यांना वारंवार सांगत राहिलो; पण त्यांच्या लक्षात आले नाही आणि ते दारू घेऊन आले. दारू म्हणजे संपत्तीशी संबंध झाला.

४. जागरूक मतदार लोकशाहीचा आधार आहे आणि आजचा मतदार जागरूक झाला आहे. त्याने पाहिले की, हे सगळे दारूचा विचार करतात. दारू डोळ्यासमोर आली की, पैसा, धन, दौलत आली. मग सगळे बिघडले आणि त्यामुळे जनतेने त्यांना जो कौल दिला तो बरोबर दिला. असे वागत असलेले लोक सत्तेवर आले, तर देश, देहली नष्ट होईल म्हणून मतदारांनी त्यांना नकार दिला.

५. हे जेव्हा माझ्यासमवेत आले त्या वेळेला मी त्यांना आधीपासून सांगत आलो की, जनतेचे सेवा करा. सेवेचा अर्थ ‘निष्काम कर्म. फळाची अपेक्षा न करता केलेले कर्म’ ही ईश्‍वराची पूजा असते. अशी पूजा तुम्ही करत रहा तुम्हाला कुणी हटवणार नाही.