मागील सरकारमध्ये कृषीमंत्री असतांना धनंजय मुंडे यांचा ८८ कोटी रुपयांचा घोटाळा ! – अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या

नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे आणि अंजली दमानिया

मुंबई – राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे मागील सरकारमध्ये कृषीमंत्री असतांना त्यांनी ८८ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. महाबीज, कषी विज्ञान केंद्र आणि महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित. (एम्.ए.आय.डी.सी. – महाराष्ट्र ॲग्रो इंडिस्ट्रिज डेव्हलमेंट कॉर्पाेरेशन लिमिटेड) यांच्या योजनांचे पैसे शासकीय यंत्रणेकडून न देता उपकरणांच्या खरेदीसाठी निविदा काढण्यात आली. या निविदेमध्ये बाजारभावाने दुप्पट दराने वस्तूंची खरेदी करण्यात आली. त्यासाठी धनंजय मुंडे पाठपुरावा करून सरकारी यंत्रणेच्या सूचीतून काही गोष्टी वगळण्यास भाग पाडले आणि त्यातून हा घोटाळा करण्यात आला, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ४ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन केला.

दमायिनांचे यापूर्वीचे आरोप टिकले आहेत का ? – धनंजय मुंडे, कृषीमंत्री

महाराष्ट्रातील ४ लाख शेतकर्‍यांना ‘नॅनो’ खत मिळाले आहे. दमानिया यांचे आरोप केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहेत. अंजली दमानिया यांनी यापूर्वी केलेले आरोप टिकले आहेत का ? खरे ठरले आहेत का ? एक विषय शांत झाला की, दुसरा विषय. माझ्यावर आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी त्यांना दिले आहे, त्याविषयी दमानिया यांना शुभेच्छा आहेत. ५९ दिवस एकाच माणसाचे ‘मिडिया ट्रायल’ (माध्यमांकडून न्यायाधिशांच्या भूमिकेत राहून केलेले वार्तांकन) होते. याच्या मागे कोण आहेत ? असे मत धनंजय मुंडे यांनी प्रसिद्धीमाध्यमांकडे व्यक्त केले आहे.