‘लाडली लक्ष्मी’ योजनेचे ४ सहस्र ३११ अर्ज मागील ३ वर्षे प्रलंबित

पणजी, २ फेब्रुवारी (वार्ता.) – सरकारच्या ‘लाडली लक्ष्मी’ योजनेचे ४ सहस्र ३११ अर्ज मागील ३ वर्षे प्रलंबित आहेत. महिला आणि बाल कल्याण खात्याने जुलै २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा अधिवेशनात प्रलंबित अर्ज त्वरित मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते; मात्र हे आश्वासन देऊन ७ मास उलटूनही हे अर्ज अजूनही प्रलंबित आहेत.

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी वर्ष २०१२ मध्ये ‘लाडली लक्ष्मी’ ही लोकप्रिय योजना चालू केली. या योजनेच्या अंतर्गत वार्षिक ३ लाखांहून अल्प आर्थिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलीला लग्नासाठी १ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाते. यानंतर सरकारने वर्ष २०२२ मध्ये योजनेच्या अंतर्गत वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवून ती ८ लाख रुपये केली. पूर्वी लग्नाच्या अगोदर या योजनेसाठी अर्ज करण्याची मोकळीक होती; मात्र वर्ष २०२२ नंतर लग्न झाल्यानंतरच या योजनेसाठी अर्ज करण्याची अट घालण्यात आली. या योजनेचे मागील ३ वर्षांत ४ सहस्र ३११ अर्ज महिला आणि बाल कल्याण खात्याकडे प्रलंबित आहेत.

संपादकीय भूमिका

सरकारी योजनांचा लाभ लाभार्थींपर्यंत वेळेत पोचला नाही, तर जनतेत ‘केवळ मतांसाठी योजना घोषित केल्या जातात’, असा समज निर्माण होईल !