होळी आणि धूलिवंदन यांनिमित्त अश्लील गाण्यांवर प्रतिबंध !

मुंबई पोलिसांचा प्रसिद्धीपत्रकाद्वारे आदेश !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – १३ आणि १४ मार्च या दोन्हीही दिवशी होळी आणि धूलिवंदन या सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे नियमावली घोषित केली आहे. याविषयीचे आदेश १२ ते १८ मार्च २०२५ पर्यंत असणार आहेत. यात दिलेल्या नियमांनुसार अश्लील शब्द असलेल्या गाण्यावर प्रतिबंध असेल. अनोळखी लोकांवर रंग किंवा पाणी फेकणार्‍यांवर कारवाई केली जाईल. ‘समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये’, अशी सूचना मुंबई पोलिसांनी दिली आहे. रमझानचा महिना चालू असल्याने मुंबई पोलिसाकडून दक्षता घेण्यात आली आहे.

वृक्षतोड करू नये !

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करू नये. अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात येईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कळवण्यात आले. अनधिकृत वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधितांना न्यूनतम १ सहस्र ते ५ सहस्र रुपयांपर्यंत दंड आकारण्याचे प्रावधान आहे. त्यासह १ आठवडा ते एक वर्षापर्यंत बंदीवासाची शिक्षा होऊ शकते.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,…

१. अश्लील शब्द किंवा घोषणांचे सार्वजनिक उच्चारण किंवा अश्लील गाणी गाणे.

२. हावभाव किंवा नक्कल यांचा वापर आणि चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा गोष्टींचे, प्रदर्शन किंवा प्रसार करणे ज्यामुळे कुणाचीही प्रतिष्ठा, सभ्यता किंवा नैतिकता दुखावते.

३. पादचार्‍यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेकणे.

४. रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे तयार करणे आणि/किंवा फेकणे.

या आदेशांचे उल्लंघन करणार्‍यांना किंवा उल्लंघन करण्यास साहाय्य करणार्‍यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार शिक्षा केली जाईल.