चिखली-कुदळवाडीतील अनधिकृत भंगार दुकाने हटवण्‍यास व्‍यापार्‍यांचा विरोध !

पुणे – चिखली, कुदळवाडी परिसरात मोठ्या संख्‍येने अनधिकृत भंगार दुकाने आणि गोदामांसह इतर व्‍यावसायिक आस्‍थापने आहेत. अशा ५ सहस्र आस्‍थापनांना महापालिकेने नोटिसा बजावल्‍या होत्‍या. अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेड १५ दिवसांत काढून टाकाव्‍यात, अन्‍यथा ती पाडण्‍याची चेतावणी नोटिशीद्वारे दिली होती. हा कालावधी संपल्‍याने महापालिकेने ती पाडण्‍याची कारवाई चालू केली; मात्र येथील व्‍यावसायिकांनी या वेळी प्रतिकार केला. व्‍यापार्‍यांनी देहू-आळंदी रस्‍ता बंद आंदोलन केले. व्‍यापार्‍यांचा विरोध आणि आंदोलन यांमुळे कारवाईसाठी आलेले पथक परत गेले. महानगरपालिका उपायुक्‍तांनी त्‍यांना दस्‍तऐवजांचे सादरीकरण करून अनधिकृत बांधकामे वैध करून घेण्‍याविषयी सांगितले. व्‍यापार्‍यांनी तसे करण्‍याची सिद्धता दर्शवली आहे; मात्र पालिकेने यासाठी स्‍वतंत्र विभाग करण्‍याची मागणी केली आहे.