बुरखा घातलेला असू दे अथवा नसू दे, कोणीही विद्यार्थी ‘कॉपी’ करणार नाही ! – दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे

मुंबई – ‘कॉपीमुक्‍त परीक्षा’ हे आपल्‍या शिक्षण विभागाचे अभियान आहे. कुणीही कॉपी करणार नाही याची विभाग काळजी घेत आहे. परीक्षा केंद्रात छायाचित्रक बसवलेले आहेत. पोलीस बंदोबस्‍तही आहे. पर्यवेक्षक आहेत, या सर्वांच्‍या माध्‍यमातून कुणी विद्यार्थी कॉपी करणार नाही, याची विभाग काळजी घेत आहे. बुरखा घातलेला असू दे किंवा विनाबुरखा घातलेला असू दे, कुणी विद्यार्थी कॉपी करणार नाही, असे मत राज्‍याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्‍यक्‍त केले.

इयत्ता १० वी आणि १२ वीच्‍या परीक्षेत बुरखा घालून परीक्षा देण्‍यास अनुमती नाकारण्‍यात यावी, अशी मागणी भाजप नेते आणि मत्‍स्‍य विकास मंत्री नितेश राणे यांनी राज्‍याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्‍याकडे केली आहे. त्‍यावर मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बांगलादेशींवर कठोर कारवाई होण्‍याविषयी कुणाचेच दुमत नाही ! 

मालेगाव येथे बांगलादेशी लोकांना अधिकार्‍यांनी खोटी कागदपत्रे दिली असतील, त्‍यांना भारताचे नागरिकत्‍व दिले असेल, तर हा भारताच्‍या स्‍वातंत्र्यालाच धोका आहे. त्‍यामुळे ज्‍याने कुणी हे कृत्‍य केले असेल, त्‍याच्‍यावर कठोर कारवाई केली पाहिजे. यावर कुणाचे काही दुमत असण्‍याचे कारण नाही, असे त्‍यांनी या वेळी सांगितले.

भाजपचे नेते किरीट सोमय्‍या यांनी हा विषय पुढे आणला नसता, तर माहिती उघड झाली असती का ? त्‍यांच्‍याकडे अधिकची माहिती असेल आणि ते जर यासाठी येत असतील, तर कुणाला वाईट वाटण्‍याचे काही कारण नाही. त्‍यांनी जर या प्रकरणी पुढाकार घेतला नसता, तर हे प्रकरण पुढे आले असते का ? तर हा प्रकार सर्रास चालू राहिला असता.

संपादकीय भूमिका

‘कॉपी’सारखे प्रकार पूर्णपणे बंद होण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांना नैतिक आणि धर्माचरणी बनवणे आवश्‍यक आहे !