प्रयागराज – इंडिगो विमान आस्थापनाने महाकुंभपर्वाच्या निमित्ताने प्रयागराज येथे जाण्यासाठी केलेली अवाच्या सवा भाडेवाढीत ३० ते ५० टक्के इतकी कपात केली आहे.
सर्व आस्थापनांनी विमानभाड्यात प्रचंड वाढ केली होती. चेन्नई-प्रयागराज आणि प्रयागराज-चेन्नई हे विमानभाडे सवा लाख रुपयांच्या घरात पोचले होते. मागणी वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे स्पष्टीकरण विमान आस्थापनांनी दिले होते. विमान आस्थापनाच्या या मनमानी कारभारामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करत विमान आस्थापनांना प्रयागराजच्या तिकीटांचे दर वाजवी ठेवण्यात सांगितले होते. त्यानंतर इंडिगोने भाडेकपात केली आहे. सध्या इंडिगोचे देहली ते प्रयागराजचे भाडे १३ सहस्र ५१३ रुपये, तर मुंबई ते प्रयागराजचे भाडे २० सहस्र ६०६ रुपये इतके असल्याचे सांगितले जात आहे.