श्री. प्रीतम नाचणकर, प्रयागराज
प्रयागराज (उत्तरप्रदेश), २८ जानेवारी (वार्ता.) – येथे चालू असलेल्या महाकुंभामध्ये ७ सहस्र १९२ संस्थांची व्यवस्था करण्याचे उद्दिष्ट उत्तरप्रदेश शासनाकडून निश्चित करण्यात आले होते. त्यांतील ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. ५ टक्के शेष असलेले काम नवीन संस्थांच्या व्यवस्थेचे आहे. ही सर्व व्यवस्था उत्तरप्रदेश शासनाच्या नगर विकास विभागाकडून करण्यात आली आहे. नुकताच या सर्व कामांचा आढावा नगरविकास विभागाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला. याविषयीची माहिती ‘सनातन प्रभात’ला प्राप्त झाली आहे.
१. यावर्षी महाकुंभामध्ये नवीन १ सहस्र २०० संस्थांना शासनाकडून सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये जागा आणि तंबू यांसह वीज, पाणी, स्वच्छता कर्मचारी आदी सुविधांचा समावेश आहे.
२. शासनाद्वारे सुविधा देण्यात आलेल्या संस्थांमध्ये १३ आखाड्यांची २९ शिबिरे उभारण्यात आली आहेत. या सर्व आखाड्यांच्या महामंडलेश्वरांसाठी शासनाने ४६० ठिकाणी व्यवस्था केली आहे. ३०० ठिकाणी आचार्यांसाठी, दण्डी संन्यासांसाठी २२५ ठिकाणी, तर खालसा आखाड्यांतील साधूंसाठी ७५० ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.
३. यासह अन्य मान्यवर, साधू, पत्रकार आदी समाजातील विविध घटकांसाठी तब्बल २ सहस्र ७५४ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.
४. सर्व आखाडे, आध्यात्मिक संस्था, कल्पवासी (कुंभक्षेत्री येऊन व्रत करणारे) आदी मिळून आतापर्यंत त्रिवेणी संगम आणि गंगा नदीमध्ये तब्बल १३ कोटी भाविकांनी स्नान केले आहे.
५. २९ जानेवारी या दिवशी मौनी अमावास्येच्या दिवशी कुंभक्षेत्रात १० कोटी भाविक स्नानासाठी प्रवेश करतील, असा अनुमान उत्तरप्रदेश शासनाकडून वर्तवण्यात आला आहे.
कल्पवासींसाठी १ सहस्र १०० जागा !
महाकुंभामध्ये कल्पवासींकरता १ सहस्र १०० ठिकाणी रहाण्याची व्यवस्था शासनाकडून करण्यात आली आहे. या ठिकाणी कल्पवासी समूहाने रहात आहेत.