Subhash Chandra Bose Was Murdered : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या झाली असून त्याविषयीची कागदपत्रे सरकारने सार्वजनिक करावीत !

भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची मागणी

नेताजी सुभाषचंद्र बोस व डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

सुरत (गुजरात) – नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा तैवानमध्ये अचानक मृत्यू झाला नाही. उलट त्यांचा खून झाला. तत्कालीन सरकारने पुरावे दडपून देशातील जनतेपासून सत्य लपवले. या प्रकरणातील सर्व पुरावे सार्वजनिक करावेत, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी बारडोली येथे केली. ते येथे ‘रन टू रिमेंबर सुभाष संग्राम’ (सुभाषचंद्र बोस यांच्या संग्रामाच्या आठवणींसाठी धावा) मॅरेथॉनचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. यामध्ये अनुमाने २ सहस्र धावपटू सहभागी झाले होते.

डॉ. स्वामी म्हणाले की,

१. तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांचे स्वीय सचिव म्हणाले होते की, नेहरूंनी मला वर्ष १९४५ मध्ये रात्री दूरभाष करून तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधानांना पत्र लिहायला सांगितले. त्यांनी सांगितले की, ‘सुभाषचंद्र बोस अजूनही जिवंत आहेत आणि आमच्या कह्यात आहेत. पुढे काय करायचे, ते आपण एकत्र ठरवले पाहिजे.’

२. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे सत्य बाहेर आले पाहिजे. तैवानमध्ये त्यांचा मृत्यू झाला नाही. अमेरिकेनेही येथे एकही विमान कोसळले नसल्याचे सांगितले होते.

३. आम्ही कधीही रशियाला त्याविषयीची कागदपत्रे देण्यास सांगितली नाहीत. कागदपत्रे मागवून चौकशी करायला हवी होती. नरेंद्र मोदी अन्वेषण करतील, अशी मला आशा होती; पण त्यांनीही अन्वेण पुढे नेला नाही.

४. मी केंद्रीय मंत्री असतांना तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी मला थेट सांगितले होते की, तुम्ही हे सूत्र मांडले, तर गदारोळ होईल. सर्व काँग्रेसजन घाबरले आहेत. मी अजूनही म्हणतो की, या विषयावर कुणाला वाद घालायचा असेल, तर घाला, मी सिद्ध आहे. कागदपत्रे कुठे आहेत, ते मी तुम्हाला दाखवू शकतो. कागदपत्रे काढा आणि सार्वजनिक करा.