३० हिंदुत्वनिष्ठांनी घेतली ‘शस्त्रसज्ज संन्यासा’ची दीक्षा !

प्रयागराज (उत्तरप्रदेश), २४ जानेवारी (वार्ता.) – उत्तरप्रदेशातील कानपूर येथील ‘शिवशक्ती आखाड्या’च्या ३० हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शस्त्रसज्ज संन्यास स्वीकारला आहे.यासह आखाड्याचे २ सहस्र २०० युवक शस्त्र प्रशिक्षित धर्मयोद्धे म्हणूनही सज्ज झाले आहेत. शिवशक्ती आखाड्याचे प्रमुख मधुराम शरण शिवाजी महाराज यांनी याविषयीची माहिती ‘सनातन प्रभात’ला दिली. सर्व शस्त्रसज्ज संन्यासी महाकुंभमेळ्यात आले आहेत.
याविषयी माहिती देतांना मधुराम शरण शिवाजी महाराज म्हणाले, ‘‘सनातन हिंदु धर्माच्या रक्षणासाठी हिंदू आता शस्त्रधारी होणार आणि त्याद्वारे हिंदु राष्ट्र स्थापन करणार. ‘शस्त्रमेव जयते’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. ‘शस्त्रमेव सत्यम्, सत्यम् शस्त्रमेव’ या हेतूने आम्ही समाजात भ्रमण करतो. बैठका घेतो. यात्रा करतो. जेवढे काही सनातनी हिंदू आहेत, त्यांनी शस्त्रधारी व्हावे, यासाठी समाजात जाऊन लोकांना आम्ही प्रेरित करतो. सद्य:स्थितीत देशात राज्यघटना, धर्म, पर्यावरण आदींची चर्चा चालू आहे; परंतु यांसाठी या भूमीवर हिंदू असणे आवश्यक आहे. त्यासाठीच आम्ही हिंदु राष्ट्राची मागणी करत आहोत.’’
… तर आमची सेना सिद्ध असेल !
आतापर्यंत आम्ही ४० नगरांमध्ये प्रवास केला आहे. घर, कुटुंब यांचा त्याग करून, उच्चपदस्थ नोकरीचा त्याग करून हे युवक सशस्त्र संन्यासी झाले आहेत. हिंदु युवकांना सशस्त्र संन्यासी करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. कुंभमेळ्यातही हे कार्य चालू राहील. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी शिवशक्ती आखाडा युवकांची सेना सिद्ध करेल. येणार्या काळात हिंदु धर्मावर कुणी सामूहिक आक्रमण केले, तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी आमची सेना सिद्ध असेल, असे मधुराम शरण शिवाजी महाराज म्हणाले.
प्रत्येक गावातून १० धर्मयोद्धे !
‘धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र घेऊन या’, असे आम्ही हिंदूंना आवाहन करतो. रात्री आम्ही विविध जातींच्या लोकांना बोलावतो. त्यांच्या घरी भोजन करतो. त्यानंतर आखाड्यातील संन्यासी गावोगावी जाऊन जातीभेद दूर करून हिंदुत्वाच्या सूत्रावर कार्य करतात. ते धर्मासाठी काहीही करायला सिद्ध होतात. प्रत्येक गावातून असे १० धर्मयोद्धे हेरून निवडण्यात येतात. त्यांना या आखाड्यामध्ये भरती केले जाते. प्रत्येक ठिकाणी अशा २०० युवकांना आखाड्यामध्ये भरती करण्याचे आमचे ध्येय आहे. त्रिशूळ, तलवार, भाला, गदा ही शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण आमच्याकडे दिले जात असल्याची माहिती मधुराम शरण शिवाजी महाराज यांनी दिली.
कुंभमेळ्यात येऊन हिंदूंनी धर्म जाणून घ्यावा !
हिंदू हे हिंदु धर्माला मानतात; पण त्यांनी धर्मशिक्षण घेतलेले नाही. हिंदूंनी कुंभमेळ्यात येऊन हिंदु धर्म जाणून घ्यावा. हिंदु धर्म जाणून घेतला, तरच ते धर्मयोद्धा होऊ शकतील. धर्माचे रक्षण करायचे असेल, तर हिंदूंना शस्त्रधारी व्हावेच लागेल. शस्त्रमेव जयते म्हणजे ज्याच्या हातामध्ये शस्त्र आहे, त्यांच्याच वेदांचा, संस्कृतीचा, परंपरांचा मान राखला जातो, असे मधुराम शरण शिवाजी महाराज म्हणाले.
‘सनातन प्रभात’ने मधुराम शरण शिवाजी महाराज यांची घेतलेली मुलाखत पहाण्यासाठी क्लिक करा : https://www.youtube.com/watch?v=adLhpamNbbE