बांगलादेशातील हिंदूंसाठी धोक्याची घंटा !

हिंदूंचा नरसंहार करणार्‍या सुर्‍हावर्दीचा बांगलादेशाच्या पाठ्यपुस्तकात धडा !

१. बंगालचा कसाई हुसेन सुर्‍हावर्दी !

‘पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर बांगलादेशात इस्लामी कट्टरतावादाला सतत प्रोत्साहन दिले जात आहे. या संपूर्ण उपक्रमाला बांगलादेशाच्या महंमद युनूस सरकारकडूनच प्रोत्साहन दिले जात आहे. यासंदर्भात बांगलादेशात मुलांना शिकवल्या जाणार्‍या पुस्तकांमध्ये आता पालट करण्यात आले आहेत. अशाच एका पुस्तकात हिंदूंच्या कत्तलीचे आदेश देणारे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि मुस्लीम लीगचे नेते हुसेन सुर्‍हावर्दी याचे कौतुक करण्यात आले आहे. आता बांगलादेशाची मुले या कसायाविषयी वाचतील.

हिंदूंंच्या कत्तलीसाठी हुसेन सुर्‍हावर्दी याला ‘बंगालचा कसाई’ म्हटले गेले. बंगालचा पंतप्रधान असतांना सुर्‍हावर्दी याने हे हत्याकांड घडवून आणले होते. वर्ष १९४३ च्या बंगाल दुष्काळाची परिस्थिती आणखी बिकट करणारा सुर्‍हावर्दीच होता. सुर्‍हावर्दीच्या राजवटीत वर्ष १९४६ मध्ये धर्मांधांनी ‘थेट कृती दिन’ (डायरेक्ट ॲक्शन डे) कार्यवाहीत आणला आणि सहस्रो हिंदूंंची हत्या केली. आता बांगलादेशात हिंदूंवर सतत आक्रमणे होत आहेत आणि युनूस सरकार सुर्‍हावर्दी याचे उदात्तीकरण करत आहे, तसेच त्याच्या कट्टरपंथीय विचारांना प्रोत्साहन देत आहे. वास्तविक मुलांमध्येही तोच मूलतत्त्ववाद रुजवण्याची ही योजना आहे.

२. सुर्‍हावर्दी आणि वर्ष १९४६ चा नरसंहार

१६ ऑगस्ट १९४६ हा दिवस भारतीय इतिहासातील हिंदुविरोधी हिंसाचाराच्या दिवसांपैकी सर्वांत क्रूर दिवस आहे. त्याला ‘कोलकाता नरसंहार’ असेही म्हणतात. हा ५ दिवसांच्या नरसंहाराचा प्रारंभ होता. त्यात अनुमाने ५ सहस्र लोक मारले गेले, सहस्रो हिंदू घायाळ झाले आणि १ लाख २० सहस्र लोक बेघर झाले. या हत्याकांडापूर्वी मुस्लीम लीगचे नेते महंमद अली जिना यांनी ‘प्रत्यक्ष कृती दिना’ची हाक दिली होती. जिनाने कोलकात्याच्या हिंदु लोकसंख्येविरुद्ध लूट, हत्या आणि लैंगिक अत्याचार करण्यासाठी लोकांना चिथावले.

जिना यांनी त्यांच्या घोषणेत स्पष्ट केले होते की, मुस्लीम लीग ब्रिटीश सरकारला सहकार्य करणे थांबवेल आणि संवैधानिक पद्धतींने निरोप देईल. जिना यांनी देशभर हिंसाचाराचा मार्ग अवलंबण्याची घोषणा केली होती. हिंदु समुदायाच्या कत्तलीचे जीनांचे स्वप्न साकार करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून हुसेन शहीद सुर्‍हावर्दी होती.

३. हिंदूंच्या नरसंहारासाठी विशेष रमजान मासाची निवड

वर्ष १९४६ पूर्वी बंगाल हा मुसलमानबहुल प्रांत होता. बंगालच्या एकूण लोकसंख्येत हिंदूंचा वाटा केवळ ४२ टक्के होता; पण कोलकाता शहरात हिंदू बहुसंख्य होते. त्यांची लोकसंख्या ६४ टक्के होती. या लोकसंख्येच्या असंतुलनामुळे कोलकाता शहर सुर्‍हावर्दी आणि मुस्लीम लीग यांचे लक्ष्य बनले. त्यांना हिंदूंना घाबरवून बंगाल पाकिस्तानमध्ये समाविष्ट करण्यास भाग पाडायचे होते.

जून १९४६ मध्ये ब्रिटीश पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी सत्ता हस्तांतरणासाठी वाटाघाटी करण्यासाठी एक पथक पाठवले. हे लोक भारताच्या फाळणीविषयीही चर्चा करणार होते. तथापि काँग्रेस फाळणीच्या बाजूने नव्हती, तर मुस्लीम लीग पाकिस्तानची निर्मिती करू इच्छित होती. मुस्लीम लीगने तिच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हिंसक मार्गांचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आणि १६ ऑगस्ट १९४६ हा दिवस ‘थेट कृती दिन’ (डायरेक्ट ॲक्शन डे) म्हणून घोषित केला. हा दिवस जाणीवपूर्वक निवडला गेला. खरेतर तो रमजानचा १८ वा दिवस होता.

बद्रची लढाई याच दिवशी झाली होती. बद्रच्या या लढाईत पैगंबर महंमद यांच्या सैन्याने कुरेशांशी लढाई केली आणि त्यांचा पराभव केला. त्यामुळे अरबस्तानावर इस्लामची पकड सशक्त झाली. हे लक्षात घेऊन सुर्‍हावर्दी आणि जिना यांनी हा दिवस निवडला. त्याला कुरेश हिंदूंना आणि पैगंबर महंमद यांचे सैन्य भारतातील मुसलमानांना दाखवायचे होते. त्यांनी वर्तमानपत्रे आणि बैठका यांमधूनही भरपूर विष ओकले. मुस्लीम लीगच्या सदस्यांनी ‘लढून पाकिस्तान घेऊ, पाकिस्तान मिळवून राहू, अल्लाहू अकबर, नारा-ए-तकबीर’, अशी घोषणा दिली.

मुस्लीम लीगचे मुखपत्र ‘द स्टार इंडिया’ने लिहिले, ‘मुसलमानांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, अल्लाहने जिहादला अनुमती दिली, तेव्हा रमजान होता. रमजानमध्येच बद्रची लढाई झाली, जी इस्लाम आणि मूर्तीपूजक यांमधील पहिली उघड लढाई होती आणि ती केवळ ३१३ मुसलमानांनी जिंकली होती. त्यानंतर पुन्हा रमजानमध्येच पैगंबरांच्या नेतृत्वाखाली १० सहस्र मुसलमानांनी मक्का जिंकली होती आणि अरबस्तानात स्वर्ग अन् इस्लाम यांचे राज्य स्थापन केले होते. मुस्लीम लीग भाग्यवान आहे की, ती या मासात आणि या दिवशी त्यांची कृती चालू करत आहे.’

४. धर्मांध दंगलखोरांकडून हिंदुबहुल कोलकाता शहराला लक्ष्य

१६ ऑगस्ट १९४६ या दिवशी सकाळी कोलकातामध्ये हिंसाचार झाला. मुस्लिम लीगच्या नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे हिंसाचार आणखी भडकला. सुर्‍हावर्दी याने सर्व धर्मगुरूंना एक भाषण देण्याचे निर्देश दिले होते, ज्यामध्ये शुक्रवारच्या उपासकांना पाकिस्तानची निर्मिती करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास सांगितले होते. येथे हिंदूंवर आक्रमण करणे, हा स्पष्ट हेतू होता. सुर्‍हावर्दी याने मुसलमानांना स्पष्टपणे सांगितले होते की, त्यांना कायदेशीर सवलत मिळेल आणि पोलीस हस्तक्षेप करणार नाहीत. त्यामुळे त्यांना हिंदूच्या भागात उपद्रव निर्माण करण्यास आणखी प्रोत्साहन मिळाले.

सुर्‍हावर्दीने पोलिसांना काम करू दिले नाही. त्यामुळे धर्मांध मुसलमान गुंडांना कोणत्याही भीतीखेरीज त्यांचे आक्रमणे करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. जसजसे दिवस पुढे सरकत गेले, तसतशी परिस्थिती झपाट्याने बिघडत गेली. लोखंडी सळ्या, तलवारी आणि इतर शस्त्र यांनी सज्ज असलेल्या धर्मांधांच्या जमावाने कोलकाता शहरातील हिंदूंची घरे अन् व्यावसायिक आस्थापने यांना लक्ष्य करणे चालू केले. कॉलेज स्ट्रीट आणि बडाबाजार यांसारखे भाग मुसलमानांसाठी सामूहिक हत्या, बलात्कार अन् जाळपोळ करण्याचे प्रमुख लक्ष्य बनले.

या हिंसाचारात सुर्‍हावर्दीने मोठी भूमिका बजावली. हत्याकांडाच्या काही वर्षांपूर्वी त्याने बंगाल पोलिसांमध्ये हेराफेरी केली होती आणि त्यात मोठ्या संख्येने पंजाबी मुसलमान अन् पठाण यांची भरती केली होती. त्यापूर्वी कोलकाता पोलिसांमध्ये पारंपरिकपणे आरा, बलिया, छपरा आणि देवरिया येथील हिंदू पोलीस होते. सुर्‍हावर्दी याने हे पालटले आणि दंगलीच्या वेळी हिंदूंवर कारवाई केली जाईल अन् मुसलमानांनी केलेल्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष केले जाईल, याची खात्री केली. या हिंसाचारासाठी दीर्घकालीन योजना आखण्यात आली होती. पेट्रोल गोळा करण्यासाठी आणि गुंडांना अन्न अन् पाणी पुरवण्यासाठीही विशेष व्यवस्था होती.

५. नौआखालीमध्ये ५ सहस्र हिंदूंचा नरसंहार

या हत्याकांडानंतर अवघ्या ६ दिवसांनी ब्रिटीश सरकारने दंगलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सैन्य पाठवले; परंतु तोपर्यंत बरीच हानी झाली होती. हा हिंसाचार नंतर बिहार आणि पंजाबसह इतर भागांत पसरला. त्यानंतर काही दिवसांनी मुसलमानांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर १९४६ या कालावधीत नौआखाली हत्याकांडाचा कट रचला. सुर्‍हावर्दीचे सहकारी आणि मुस्लीम लीगचे नेते गुलाम सरवर हुसेनी हे या हत्याकांडाचे सूत्रधार होते. नौआखालीमध्ये अनुमाने ५ सहस्र हिंदूंची हत्या झाली.

६. सुर्‍हावर्दीचे दुष्कृत्य पुसून टाकण्यास प्रारंभ

आता सुर्‍हावर्दीच्या दुष्कृत्यांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुर्‍हावर्दी याला ‘डायरेक्ट ॲक्शन डे’पासून वेगळे करण्याचे प्रयत्नही चालू आहेत. त्याचे केवळ उदात्तीकरणच केले जात नाही, तर इतिहासातील एक प्रमुख पुरुष म्हणूनही त्याला चित्रित केले जात आहे. प्रत्यक्षात सुर्‍हावर्दी याला कोलकात्यात ‘गुंडांचा राजा’ म्हणून ओळखले जात असे. ‘बंगालचा कसाई’ म्हणून त्याची कृत्ये विविध इतिहासकारांनी नोंदवली आहेत. असे असतांनाही महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश सरकार ते लपवण्याचा प्रयत्न करत आहे.

(साभार : ‘ऑपइंडिया’चे संकेतस्थळ)

संपादकीय भूमिका

‘बंगालचा कसाई’ म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या सुर्‍हावर्दीचा खरा इतिहास जगासमोर आणून भारताने बांगलादेश सरकारकडे विरोध दर्शवायला हवा !