PM Modi Sending Chadar To Ajmer Dargah : पंतप्रधान मोदी यांच्याकडून अजमेर दर्ग्यात चादर चढवण्यावर बंदी घालण्यासाठी हिंदु सेनेकडून न्यायालयात याचिका !  

अजमेर दर्गा पूर्वीचे मंदिर असल्याविषयी हिंदु सेनेने न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केली आहे याचिका

नवी देहली – अजमेर (राजस्थान) येथील मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्यात उरूसाच्या (मुसलमानांच्या धार्मिक मिरवणुकीच्या) निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने चादर चढवण्यात येते. याला तात्पुरती बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका हिंदु सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी अजमेर येथील न्यायालयात प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे.

या याचिकेत म्हटले आहे की, एक प्राचीन शिवमंदिर पाडून हा दर्गा बांधण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या वतीने दर्ग्यात चादर चढवल्याने न्यायप्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. न्यायालयात खटला प्रलंबित असतांना चादर सादर चढवणे, हे न्यायालयाच्या स्वातंत्र्याचे आणि निष्पक्ष खटल्याच्या अधिकाराचे उल्लंघन ठरेल. दर्ग्याची रचना आणि तेथे आढळणार्‍या काही वैशिष्ट्यांवरून हे सिद्ध होते की, या जागेवर मुळात हिंदु मंदिर होते. मुख्य प्रवेशद्वाराच्या छताची आणि छत्रीची रचना हिंदु स्थापत्यकलेचे निदर्शक आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या जागेची चौकशी करून तेथे भगवान श्री संकटमोचन महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करावा. दर्ग्याच्या भूमिगत मार्गात एक शिवलिंग आहे, ज्याची पूजा करण्याचा हिंदूंना घटनात्मक अधिकार आहे. हा अधिकार सध्या डावलला जात आहे.

गेल्या महिन्यात याच प्रकरणात न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला नोटीस बजावली होती.

पंतप्रधानांच्या वतीने दर्ग्यात चादर चढवली

२ जानेवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री आणि संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे चादर सुपूर्द केली होती. ती उरूसाच्या निमित्ताने दर्ग्यात चढवण्यात येणार होती. रिजिजू यांनी ४ जानेवारी या दिवशी सकाळी अजमेर येथे येऊन ती चादर दर्ग्यात चढवली. येथे त्यांनी देशात शांतता आणि बंधुभाव यांसाठी प्रार्थना केली.

दर्ग्यावर पंतप्रधानांकडून चादर चढवणे; म्हणजे देशाच्या वतीने चादर अर्पण करण्यासारखे ! – किरेन रिजिजू

यापूर्वी जयपूर विमानतळावर रिजिजू म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या वतीने चादर अर्पण करणे; म्हणजे संपूर्ण देशाच्या वतीने चादर अर्पण करण्यासारखे आहे. देशात चांगले वातावरण हवे आहे.

अजमेर येथील दर्ग्याला लाखो लोक भेट देतात. त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ‘गरीब नवाज’ अ‍ॅप आणि संकेतस्थळ चालू करण्यात येत आहे. (हिंदूंच्या जागृत मंदिरांविषयी सरकारने असे प्रयत्न आतापर्यंत का केले नाहीत ? मंदिरांचे सरकारीकरण करण्यात आले असतांना या दर्ग्याचे सरकारीकरण का करण्यात येत नाही ? असे प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतात ! – संपादक)