नुकतेच रशियाने युक्रेनच्या ‘पॉवर ग्रीड’वर (वीज निर्मिती केंद्रापासून वीज वाहिन्यांद्वारे वीज ग्राहकांपर्यंत पोचवणारी यंत्रणा) मोठ्या प्रमाणात आक्रमण केले. त्यामुळे युक्रेनमधील लाखो लोक अंधारात आहेत. ऐन हिवाळ्यात हे आक्रमण झाल्याने लाखो युक्रेनी नागरिकांना शून्य अंशापेक्षा न्यून तापमानात रहावे लागत आहे. यातून बर्याच गोष्टी आपल्या लक्षात येतात. शत्रूचे सैनिक मेल्याने शत्रूवर जेवढा दबाव येतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक दबाव सामान्य नागरिक मेल्यावर किंवा ते त्या स्थितीत आल्यावर येतो. हा दबाव त्या राष्ट्रातील जनतेकडूनही असतो. शत्रूचे मनोबल त्यामुळे लवकर खच्ची होते. पॉवर ग्रीडवरच आक्रमण झाल्याने विजेच्या अभावी युक्रेनच्या उद्योगांवरही त्याचा परिणाम होणार आहे. याला ‘मर्मावर किंवा शक्तीकेंद्रावर घाव घालणे’, असे म्हणतात. अशाप्रकारे शत्रूची कोंडी करणे, हा युद्धनीतीचा भाग असतो. या पार्श्वभूमीवर दुसर्या महायुद्धातील एक प्रसंग पाहू.
१. जर्मनीला रोखण्यासाठी ‘मोहने’ नावाचे धरण उडवण्याची योजना इंग्लंडच्या गुप्तचर विभागाने सादर करणे
दुसर्या महायुद्धात जर्मनी युरोप गिळंकृत करत चालला होता. जर्मनीला, म्हणजे हिटलरला थांबवणे जवळजवळ अशक्य झाले होते. औद्योगिक क्षेत्रातही जर्मनी प्रगती करत होता. जर्मनीतील बहुतांश उद्योग हे युद्धसामुग्रीची निर्मिती करत होते. जर्मनीतील जवळजवळ ५० टक्के उद्योगांना लागणार्या विजेची निर्मिती रुहर व्हॅलीतील ‘मोहने’ नावाच्या धरणातून केली जात होती. त्यामुळे ते धरण उडवून देण्याची कल्पना इंग्लंडच्या गुप्तचर विभागातील बार्न्स वॅलीस नावाच्या एका व्यक्तीला सुचली. त्याने याविषयी सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला. ‘त्याची कल्पना एखाद्या सिनेमा किंवा ‘नॉव्हेल’चा (कादंबरीचा) विषय म्हणून चांगली असून प्रत्यक्षात आणणे केवळ अशक्य आहे’, असे सांगून त्याची थट्टा केली गेली.
२. ‘मोहने’ धरण उडवण्याची प्रत्यक्ष योजना करणे
त्या व्यक्तीने त्याचा अहवाल सादर केल्यानंतर पुढे ४-५ वर्षे झाली; पण हिटलरला थांबवण्याचा कोणताही ठोस उपाय कुणाकडेही नव्हता. निर्वाणीची वेळ म्हणून इंग्लंडच्या गुप्तचर विभागाने त्या व्यक्तीचा अहवाल पुन्हा बाहेर काढला आणि त्या व्यक्तीला ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी काय काय करावे लागेल, याचा अभ्यास करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने अभ्यास केला. धरणाची भिंत कित्येक मीटर लांब होती. धरणाच्या भिंतीजवळ पाण्याची खोली शेकडो फूट होती. पाणबुडीच्या साहाय्याने पाण्याच्या खालून कुणी भिंतीजवळ पोचू नये, यासाठी धरणाच्या भिंतीपासून २०० मीटर अंतरावर एक लोखंडी जाळी तळापर्यंत सोडण्यात आली होती. त्याच्या पुढे २०० मीटर अंतरावर दुसरी लोखंडी जाळी पाण्याच्या तळापर्यंत सोडण्यात आली होती.
त्या व्यक्तीची कल्पना खरोखरच सिनेमात शोभावी अशीच होती. ती नेमकी काय होती ? सांगतो ! ‘आपण लहानपणी नदी किंवा तलावात एखादा चपटा दगड अशा प्रकारे फेकला असेल की, तो पाण्यात लगेच न बुडता पाण्यावर टप्पे खात खात पुढे जाऊन बुडतो. जर्मनीतील धरण उडवून लावण्यासाठी एक मोठा बाँब अशाच प्रकारे टाकायचा, जेणेकरून तो बाँब त्या दोन्ही जाळ्यांमध्ये न अडकता त्यांच्या वरून टप्पे खाऊन पुढे भिंतीजवळ जाईल’, अशी ती योजना होती.
३. धरण उडवण्यासाठी करण्यात आलेला अभ्यास
धरणाच्या भिंतीची लांबी किती आहे ?, रुंदी किती आहे ?, पाण्याची सरासरी खोली किती आहे ?, भिंतीजवळ पाण्याची खोली किती आहे ?, पहिल्या जाळीजवळ पाण्याची खोली किती आहे ?, दुसर्या जाळीजवळ पाण्याची खोली किती आहे ?, त्या त्या ठिकाणी पाण्याची घनता किती आहे ?, बाँब किती किलोचा आणि कशा आकाराचा लागेल ?, तो बाँब फेकतांना त्याची गती किती असायला हवी ?, किती उंचीवरून तो बाँब विमानातून फेकावा लागेल ?, ज्या वेळेत बाँब फेकायचा आहे, त्या वेळेत हवेची दिशा आणि गती किती असते ?, एकूण हवामान कसे
असते ?, धरणावरील पहारे पाटलण्याच्या वेळा कोणत्या आहेत ?, ज्या विमानातून बाँब टाकणार, त्या विमानाने पुढे कुठे आणि कसे जायचे ?, अशा अनेक गोष्टींचा सखोल अभ्यास केला गेला.
योजना प्रत्यक्षात आणतांना काय काय अडचणी येऊ शकतात, याचा अभ्यास करण्यासाठी ‘मॉडेल’ (नमुना) म्हणून एक छोटे धरण बांधण्यात आले, त्या प्रमाणात अन्य गोष्टी बनवून त्याची चाचणी घेण्यात आली. योजना प्रत्यक्षात कार्यान्वित करता येऊ शकते, याची खात्री पटल्यावर सगळी सिद्धता केली गेली.
४. धरण उडवण्याची प्रत्यक्ष करण्यात आलेली कार्यवाही
शेकडो किलोचा गोलाकार बाँब बनवण्यात आला. हवाई दलाच्या लढाऊ विमानाला तो टांगून नेण्याचे ठरले. ज्या ठिकाणी तो टाकायचा आहे, त्या ठिकाणी तो विमानापासून वेगळा करता येईल, अशी व्यवस्था विमानात करण्यात आली. १६ मे १९४३ हा आक्रमणाचा दिवस ठरला. रात्री पहारे पालटण्याच्या वेळी ब्रिटीश हवाई दलाचे एक विमान ‘लो फ्लाय’ करत, म्हणजे अल्प उंचीवरून उडत आले. त्या विमानाला शेकडो किलोचा गोलाकार बाँब बांधण्यात आला होता. ठरलेल्या गतीने आणि ठरलेल्या उंचीवरून ते विमान आले अन् ठरलेल्या ठिकाणी तो बाँब विमानापासून वेगळा केला गेला. गती आणि गोलपणा यामुळे बाँब पाण्यात पडल्यावर त्याने एक टप्पा खात पहिली जाळी ओलांडली, दुसरा टप्पा खात दुसरी जाळी ओलांडली अन् अजून दोन टप्पे खाऊन तो शेकडो किलो वजनाचा बाँब धरणाच्या भिंतीच्या जवळ जाऊन बुडत पाण्याच्या तळाशी गेला.
५. धरणात केलेल्या स्फोटामुळे जर्मनीची झालेली हानी आणि युद्धनीतीतील बोध
काही क्षणांत एक मोठा स्फोट झाला आणि भिंतीला प्रचंड मोठे भगदाड पडले. अब्जावधी लिटर पाणी वाहून गेले. त्यामुळे पुढील धरणाचीही हानी झाली. परिणामी दोन ‘हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन्स’ उध्वस्त झाली. वीज निर्मिती बंद पडली आणि त्यामुळे जर्मनीतील बहुतांश उद्योगही बंद पडले. धरण फुटल्यामुळे जो पूर आला, त्यामध्ये साधारणपणे १६०० जर्मन नागरिक, ६०० जर्मन कामगार आणि १००० गुलाम कामगार (जे रशियन होते) मारले गेले. जर्मनीच्या नागरिकांनी अत्यंत जलद गतीने धरणाची दुरुस्ती केली; परंतु त्यांचे उद्योग पुन्हा चालू होऊन उत्पादन पूर्ववत् होण्यास ५-६ मास लोटले.
सीमेवर लढत बसण्यापेक्षा शत्रूच्या मर्मावर किंवा शक्तीकेंद्रावर थेट आक्रमण करून त्याचे मनोबल तोडणे, हा युद्धनीतीमधील महत्त्वाचा भाग असतो. आपापल्या देशाच्या रक्षणासाठी अशा प्रकारे अनेक लोक झटत असतात आणि यशस्वीही होत असतात.
येणार्या तिसर्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शासनकर्त्यांनी अशा गोष्टींचा सखोल अभ्यास आणि त्यानुसार शत्रूला नामोहरम करण्याच्या आपल्या गुप्तचर यंत्रणांच्या अन् सेनेच्या योजनांना ‘खुली सूट’ द्यायला हवी.
– श्री. विक्रम भावे, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई.