शॅकच्या मालकासह चौघांना अटक
(‘शॅक’ म्हणजे समुद्रकिनार्यावरील तात्पुरते उपाहारगृह)
म्हापसा, ३१ डिसेंबर (वार्ता.) – कळंगुट येथील समुद्रकिनार्यावरील एका शॅकमध्ये पर्यटकांना मारहाण केल्याची घटना घडली असून यामध्ये भोला रवि तेजा (वय २८ वर्षे) या आंध्रप्रदेशातील युवकाचा ३१ डिसेंबरला पहाटे मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली गुन्हा नोंद केला आहे. या संदर्भात नोंदवलेल्या तक्रारीनुसार शॅकचा मालक आग्नेल सिल्वेरा (वय ६४ वर्षे), त्याचा मुलगा शुबर्ट सिल्वेरा (वय २३ वर्षे) आणि कर्मचारी अनिल बिस्ता (वय २४ वर्षे) अन् कमल सुनार (वय २३ वर्षे) या चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. ३० डिसेंबरला उत्तररात्री १ ते २ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार भोला रवि तेजा आणि त्याचे ४ मित्र कळंगुटमधील मरीन बिच शॅकमध्ये जेवायला गेले. या पर्यटकांनी आणखी काही जेवण मागवले, तेव्हा त्यांना स्वयंपाकघर बंद झाल्याचे सांगण्यात आले. यावरून पर्यटक आणि शॅकचे कर्मचारी यांच्यामध्ये वाद निर्माण होऊन दोन्ही गटांमध्ये हाणामारी चालू झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शॅकचा मालक आणि कर्मचारी यांनी पर्यटकांना काठीने मारायला प्रारंभ केला. या वेळी भोला रवि तेजा याच्या डोक्यावर काठी बसल्याने तो गंभीररित्या घायाळ झाला. घायाळ झालेल्या पर्यटकांना कांदोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले, तेव्हा भाेला रवि तेजा याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक परेश नायक यांनी इतर पोलिसांसह घटनास्थळी जाऊन त्वरित पंचनामा केला, तसेच पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे आणि पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली.