श्री देव रामेश्वराचा कौल झाला आणि आचरे गाव निर्मनुष्य झाले !
मालवण – तालुक्यातील संस्थानकालीन आचरे गावच्या सर्वधर्मीय एकजुटीचे दर्शन घडवणार्या आणि प्रथा-परंपरा यांची जपणूक करणार्या आचरे गावाच्या गावपळणीला १५ डिसेंबरला प्रारंभ झाला. ग्रामदैवत इनामदार श्री देव रामेश्वराने कौल दिल्यानंतर दुपारी नगारा वाजला आणि तोफा धडाडल्यानंतर ८ सहस्र लोकवस्तीचे गाव घर, मंदिरे बंद करून आबालवृद्ध, संसार साहित्य, गुरे, पाळीव प्राणी यांच्यासह निर्मनुष्य झाले. ‘ग्रामदैवत श्री देव रामेश्वर सर्वांचे रक्षण करतो’, या श्रद्धेने ग्रामस्थ ३ दिवस गावाबाहेर वास्तव्य करणार आहेत.
ऐतिहासिक अशा आचरा गावाची गावपळण ही अनोखी प्रथा प्रत्येक ३ किंवा ५ वर्षांनी होते. यापूर्वी २०१९ यावर्षी गावपळण झाली होती. आचरा गावात चैरची वाडी, देऊळवाडी, पारवाडी, नागोचीवाडी, भंडारवाडी, डोंगरेवाडी, काजीवाडा-शेखवाडा, गाउडवाडी, हिर्लेवाडी, जांमडुल वाडी अशा १२ वाड्या आहेत. या गावपळणीत गावातील सर्व धर्मियांचा सहभाग असतो. गावाच्या सीमेच्या बाहेर रहाण्यासाठी पारवाडी नदीिकनारी, वायंगणी, चिंदर, भगवंतगड रस्त्याच्या नजिक बांधलेल्या राहुट्यांमध्ये ग्रामस्थ वास्तव्य करणार आहेत. लोकांना ऊर्जा देणारी ही गावपळण प्रथा गेली कित्येक शतके आचरेवासीय आनंदाने पाळत आहेत. गावपळणीचे ३ दिवस आणि ३ रात्री झाल्यावर १८ डिसेंबरला गाव पुन्हा भरण्यासाठी श्री देव रामेश्वराला कौल लावला जाणार आहे. देवाने कौल दिला, तर त्या दिवशी गाव पुन्हा भरेल; मात्र कौल न दिल्यास गावपळणीचा १ दिवस वाढतो. त्यानंतर पुन्हा देवाचा कौल घेऊन गाव भरवण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.