खलिस्तानी आणि बीबीसी यांना विरोध केल्यामुळे पदवी मागे घेतल्याचे वृत्त
लंडन (ब्रिटन) – ब्रिटीश संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’चे भारतीय वंशाचे सदस्य रामिंदर सिंह रेंजर यांना ब्रिटिश राजघराण्याने दिलेला ‘कमांडर ऑफ ब्रिटिश एम्पायर’ (‘सीबीई’) हा सन्मान काढून घेण्यात आला आहे. तसेच अनिल भानोत यांचाही हा सन्मान काढून घेण्यात आला आहे. व्यवस्थेला अपकीर्त केल्याचा आरोप करून या दोघांना देण्यात आलेला सन्मान मागे घेण्यात आला आहे. रामिंदर सिंह रेंजर यांनी परखडपणे खलिस्तान्यांच्या विरोधात त्यांची मते व्यक्त करत असतात, तसेच त्यांनी भारतद्वेष्ट्या बीबीसीवरही टीका केली होती. या दोन्ही प्रकरणांत त्यांच्या विरोधकांनी ब्रिटीश राजघराण्याशी संबंधित संस्थेकडे तक्रार केली होती. त्याची नोंद घेत रेंजर यांना देण्यात आलेला सन्मान मागे घेण्यात आल्याचे समजते. रामिंदर सिंह रेंजर यांनी याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. रेंजर यांच्यावर संसदीय आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
🚫British Royal Family revokes honours of 2 British Indians, including an MP
📌Reports suggest the titles were withdrawn due to opposition to #Khalistanis and the #BBC
📌The individuals had opposed the BBC documentary that defamed Prime Minister #Modi
👉This reveals the true… pic.twitter.com/jRMpu7UNFz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 7, 2024
पंतप्रधान मोदी यांची अपकीर्ती करणार्या बीबीसीच्या माहितीपटाला केला होता विरोध
या संपूर्ण घटनेनंतर रामिंदर सिंह रेंजर यांनी प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘ब्रिटीश राजघराण्याने मला दिलेला सन्मान मागे घेतला आहे; कारण मी खलिस्तान समर्थक आणि भारत तोडण्याचा हेतू असलेल्या बीबीसीला (ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला) विरोध केला होता. बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात २ भागांचा माहितीपट बनवल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये २० वर्षांपूर्वी गुजरात दंगलीत पंतप्रधान मोदी यांचा सहभाग असल्याचे सूचित करण्यात आले होते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता केली होती, तरीही बीबीसीने त्यांची अपकीर्ती केली.’
रेंजर यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, रेंजर यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही किंवा त्यांनी कोणताही कायदा मोडलेला नाही. हा सन्मान काढून घेणे, ही गंभीर गोष्ट आहे. नागरिकांनी याविषयी आवाज उठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अनिल भानोत यांची पदवी काढून घेतली !
रेंजर यांच्या समवेतच हिंदु समुदाय आणि आंतरधर्मीय संबंधांसाठी ‘मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द सिव्हिल डिव्हिजन ऑफ द ब्रिटीश एम्पायर’ म्हणून अनिल कुमार भानोत यांची करण्यात आलेली नियुक्ती रहित करण्यात आली आहे. हिंदु समुदाय आणि आंतर-धार्मिक संबंधांसाठी त्यांनी केलेल्या सेवांसाठी त्यांना जून २०१० मध्ये दिवंगत राणी एलिझाबेथ यांच्या वाढदिवसानिमित्त ही पदवी प्रदान करण्यात आली होती.
संपादकीय भूमिकायावरून ब्रिटीश राजघराण्याचे खरे स्वरूप समोर येते. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली बीबीसी आणि ब्रिटनमधील खलिस्तानी भारताच्या विरोधात गरळ ओकतात. ब्रिटीश राजघराण्याच्या अशा कृतीमुळे त्यांना बळ मिळणार आहे. भविष्यात ब्रिटन भारतद्वेषाचा अड्डा बनल्यास आश्चर्य वाटणार नाही ! |