सातारा, ५ डिसेंबर (वार्ता.) – श्री क्षेत्र सज्जनगड येथील ‘श्री रामदासस्वामी संस्थान’च्या वतीने श्री समर्थ पादुका प्रचार आणि प्रसार दौरा आयोजित करण्यात आला आहे. हा दौरा श्रीक्षेत्र सज्जनगड येथून ७ डिसेंबर २०२४ या दिवशी प्रस्थान ठेवणार आहे, अशी माहिती श्री रामदासस्वामी संस्थांचे अध्यक्ष पू. भूषण स्वामी यांनी दिली.
पू. भूषण स्वामी पुढे म्हणाले, ‘‘श्री क्षेत्र सज्जनगड येथील दैनंदिन महाप्रसाद, तसेच श्री समर्थ कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रतिवर्षी ‘सांप्रदायिक भिक्षा दौरा’ आयोजित करण्यात येतो. यावर्षी हा दौरा ७ डिसेंबर २०२४ ते ७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा दौरा सातारा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना या जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी श्री क्षेत्र सज्जनगड येथील दैनंदिन उपासना, पादुका अभिषेक आणि दर्शन, भिक्षा फेरी, कीर्तन, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तरी समस्त श्री समर्थभक्तांनी या दौर्याचा लाभ घ्यावा.’’