सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या कृपेमुळे चालू झालेल्‍या भक्‍तीसत्‍संगांनी ‘मागील आठ वर्षांमध्‍ये साधकांना काय काय दिले’, याचे कृतज्ञतापूर्वक अवलोकन !

साप्‍ताहिक भक्‍तीसत्‍संगाच्‍या ‘अष्‍टवर्षपूर्ती’ निमित्ताने…

‘भाववृद्धी सत्‍संग’ या नावाने आरंभ झालेल्‍या सत्‍संगाचा प्रथम दिवस होता ५.१०.२०१६ ! या वर्षी नवरात्रीमध्‍ये आश्विन शुक्‍ल चतुर्थीला, म्‍हणजे ७.१०.२०२४ या दिवशी सत्‍संगांच्‍या या शृंखलेला ८ वर्षे पूर्ण झाली, म्‍हणजेच या भक्‍तीसत्‍संगांची ‘अष्‍टवर्षपूर्ती’ झाली. गेल्‍या ८ वर्षांपासून प्रतिसप्‍ताह असलेल्‍या या भक्‍तीसत्‍संगांनी साधकांना भरभरून ज्ञान आणि भक्‍ती यांची भेट दिली. ‘या ८ वर्षांमधील सत्‍संग शृंखलेने साधकांना काय काय दिले ?’, याचे कृतज्ञतापूर्वक अवलोकन केले असता अनेक सूत्रे लक्षात आली. ती सूत्रे लेखरूपात श्री गुरूंच्‍या चरणी समर्पित करत आहे. २८ नोव्‍हेंबर या दिवशी या लेखातील काही सूत्रे पाहिली. आज त्‍यापुढील सूत्रे पाहूया.

(भाग ३)

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

४. भक्‍तीसत्‍संगांमुळे गुरुकृपायोगाच्‍या अंतर्गत असलेली ‘अष्‍टांग साधना’ होण्‍यास साहाय्‍य होणे 

४ अ ६. सत्‍सेवा : अष्‍टांग साधनेतील सहावा टप्‍पा म्‍हणजे ‘सत्‍सेवा’ ! सत्‍सेवा म्‍हणजे ‘साक्षात् ईश्‍वराची सेवा !’ अध्‍यात्‍माचा, म्‍हणजे साधना आणि ईश्‍वरभक्‍ती यांचा प्रसार करणे, ही सर्वोच्‍च प्रतीची सत्‍सेवा श्री गुरूंनीच शिकवली आणि तेच आपल्‍याकडून ती करवून घेत आहेत. सत्‍सेवा केल्‍याने ईश्‍वराच्‍या सगुण रूपाचे, म्‍हणजे संत किंवा श्री गुरु यांचे मन जिंकता येते. सत्‍सेवा करतांना गुरूंच्‍या संकल्‍पानेच साधकाची प्रगती शीघ्र गतीने होत जाते. ‘अध्‍यात्‍मप्रसार’ ही गुरूंच्‍या निर्गुण रूपाची सेवा असून गुरुकृपेसाठी ती ७० टक्‍के महत्त्वाची आहे.

‘सत्‍सेवेतून गुरुकृपा होण्‍यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत ? सत्‍सेवा परिपूर्णतेेने कशी करायची ? सत्‍सेवेला भावाची जोड कशी द्यायची ?’ यांविषयी गुरुदेवांनी भक्‍तीसत्‍संगांच्‍या माध्‍यमातून आपल्‍याला दिशा दिली. केवळ समष्‍टी सेवा, एवढीच सत्‍सेवेची व्‍याख्‍या नसून अन्‍य अनेक कृतीही, उदा. घरातील रुग्‍णाईत, वयस्‍कर व्‍यक्‍ती, तसेच आश्रमातील रुग्‍णाईत साधक यांची सेवा करतांना ती सेवा ‘गुरुसेवा’ या भावाने करण्‍याची शिकवण गुरुदेवांनी दिली. त्‍यामुळे त्‍या कृतीही सेवा म्‍हणून घडू लागल्‍या. अशा प्रकारे प्रत्‍येक सेवा भावपूर्ण, परिपूर्ण करून आणि श्री गुरूंना अपेक्षित अशा प्रकारे करून ती ‘सत्‍सेवा’ या टप्‍प्‍यापर्यंत पोचवायला भक्‍तीसत्‍संगांनी शिकवले आहे. अशा प्रकारे भक्‍तीसत्‍संगांमुळे अष्‍टांग साधनेतील ‘सत्‍सेवा’ हा टप्‍पाही साध्‍य होत आहे.

४ अ ७. सत्‌साठी त्‍याग : अष्‍टांग साधनेतील सातवा टप्‍पा म्‍हणजे ‘सत्‌साठी त्‍याग’ ! सर्वस्‍वाचा त्‍याग केल्‍यानंतरच ईश्‍वराची प्राप्‍ती होणे किंवा ईश्‍वराशी एकरूपता येणे शक्‍य होते. त्‍यामुळे गुरुदेवांनी आपल्‍याला ‘तन-मन-धन यांचा त्‍याग कसा करायचा ?’, हे शिकवले आणि प्रसंगानुरूप ते आपल्‍याकडून प्रत्‍येक स्‍तरावरील त्‍याग करवूनही घेत आहेत. ‘तन, मन आणि धन यांचा त्‍याग करणे’, हेच साधनेचे मूळ तत्त्व आहे. साधनेमुळेच आणि साधना अन् ईश्‍वरप्राप्‍ती यांसाठी त्‍याग केल्‍यानेच खरा आनंद मिळतो; कारण ईश्‍वर सत्-चित्-आनंद स्‍वरूप आहे.

साधनेतील सर्वांत महत्त्वाचा त्‍याग म्‍हणजे मनाचा त्‍याग ! त्‍यासाठी पुष्‍कळ प्रयत्न करावे लागतात. मनाचा त्‍याग करण्‍यासाठी मनाशी बराच संघर्ष करावा लागतो; मात्र गुरुदेवांनी तो त्‍यागही आपल्‍याला अगदी सोपा करून दिला आहे. भक्‍तीसत्‍संगांत अनेक भक्‍त, संत, तसेच गुरुनिष्‍ठ शिष्‍य यांच्‍या कथांमधून ‘मनाचा, म्‍हणजे ‘स्‍व’चा त्‍याग कसा करायचा ?’, याची शिकवण दिली जाते. त्‍यामुळे त्‍यागासाठी साधकांना फारसे वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. फारशा संघर्षाविना मनाचा हा त्‍याग सहजपणे आणि आनंदाने करण्‍याची दिशा मिळते. साधकांकडून त्‍यांच्‍या नकळतच लहान लहान गोष्‍टींतही त्‍याग होत आहे. अशा प्रकारे मनःशुद्धी, तसेच आत्‍मशुद्धी यांसाठी ‘सत्‌साठी त्‍याग’ हा टप्‍पा श्री गुरुदेवच करून घेत आहेत.

४ अ ८. प्रीती : अष्‍टांग साधनेतील आठवा आणि शेवटचा टप्‍पा म्‍हणजे ‘प्रीती’ ! प्रीती म्‍हणजे निरपेक्ष प्रेम. परम प्रीतीस्‍वरूप ईश्‍वराशी एकरूप होण्‍यासाठी ‘प्रीती’ हा टप्‍पा अत्‍यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण ‘प्रीती’ हा ईश्‍वराचा स्‍थायीभाव आहे. प्रीतीमुळेच ईश्‍वराने सर्व चराचर सृष्‍टीला जोडून ठेवले आहे. ईश्‍वर अदृश्‍य आहे. सहजपणे डोळ्‍यांना न दिसणारा आहे. आजच्‍या कलियुगातील प्रीतीचे दृश्‍य आणि मूर्तीमंत उदाहरण म्‍हणजे सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव ! प्रत्‍येक घटकावर निरपेक्षपणे प्रेम करणारे गुरुदेव ! ईश्‍वरस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी ‘प्रीती’ या गुणाने जगभरातील सर्व साधकांना आपलेसे केले आहे. त्‍यांना बांधून ठेवले आहे.

गुरुदेवांनी ‘प्रीती’ या गुणाची शिकवण देऊन साधकांनाही समष्‍टीला जोडून ठेवण्‍यास शिकवले आहे. ते साधकांना प्रत्‍येक गोष्‍टीवर निरपेक्ष प्रेम करायला शिकवत आहेत. या भक्‍तीसत्‍संगांच्‍या माध्‍यमातून निरपेक्ष प्रेम करण्‍याची विविध प्रकारे दिशा मिळाली. त्‍यामुळे साधक ‘वसुधैव कुटुम्‍बकम् ।’, म्‍हणजे ‘संपूर्ण पृथ्‍वी हेच कुटुंब आहे’, अशी व्‍यापक अनुभूती घेऊ लागले आहेत. भक्‍तीसत्‍संगांनी आपल्‍याला प्रत्‍येक घटक, वस्‍तू, तसेच जीव या सगळ्‍यांत ईश्‍वराचे रूप पहायला शिकवले. त्‍यामुळे सर्वांप्रती प्रेमभाव निर्माण होण्‍यास साहाय्‍य होत आहे. अशा रीतीने प्रेमात विशालता येऊन दुसर्‍यांबद्दल प्रीती निर्माण होण्‍यास साहाय्‍य होत आहे. गुरुदेवच अष्‍टांग साधनेतील ‘प्रीती’ हा घटक साधकांमध्‍ये निर्माण करत आहेत.

अशा प्रकारे गुरुदेवांनी शिकवलेल्‍या अष्‍टांग साधनेच्‍या अंतर्गत ज्‍या ८ पायर्‍या आहेत, त्‍या माध्‍यमातूनच आपल्‍याला मोक्षाचा मार्ग चढता येतो. या प्रत्‍येक पायरीवर भक्‍तीसत्‍संगरूपी दिशादर्शक आपला आधार बनून उभा आहे. या भक्‍तीसत्‍संगांनी ‘अष्‍टांग साधनारूपी ८ पायर्‍यांचे अनुसरण कसे करायचे ?’ हे शिकवले आणि त्‍या सहजतेने चढण्‍याची दिशाही दिली. यामुळेच श्री गुरूंनी शिकवलेली साधना आनंदाने आणि सहजतेने करण्‍यासाठी साधक प्रयत्न करू शकत आहेत. अशा प्रकारे अष्‍टांग साधनेसाठी आपल्‍याला सातत्‍याने दिशादर्शन करणार्‍या भक्‍तीसत्‍संगांप्रती, भक्‍तीसत्‍संगरूपी गुरुलीलेप्रती आपण सर्वांनी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करूया.

(क्रमश:)

या लेखाचा यापुढील भाग वाचण्या करिता येथे क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/862644.html

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२६.९.२०२४)