सावंतवाडी – तालुक्यातील आंबोली घाटात रस्त्याला संरक्षक कठडा बांधण्याचे काम चालू आहे. यासाठी विविध ठिकाणी खोदण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. असे असतांना वन विभागाने ठेकेदाराला काम बंद करण्याचा आदेश देऊन ‘काम चालू ठेवल्यास कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणी दिली आहे. अशा प्रकारे वन विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे आंबोली भागातील अनेक विकासकामे बंद आहेत. याविषयी योग्य कार्यवाही करून ८ दिवसांत काम चालू न झाल्यास आंबोली ग्रामस्थांसह बेमुदत उपोषण करण्यात येईल, अशी चेतावणी शिवसेनेचे तालुका संघटक विशाल बांदेकर आणि युवासेना विभाग प्रमुख मायकल डिसोजा यांनी दिली आहे.
या रस्त्यावरून आंबोली पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ कामानिमित्त सावंतवाडी शहरात ये-जा करतात, तसेच अन्य वाहनांची वाहतूकही चालू असते. असे असतांना कठड्याचे काम बंद पाडल्याने येथे अपघात होऊन अपरिमित हानी होऊ शकते. वन विभागाच्या वतीने आंबोली परिसरात काँक्रिटची आणि इमारत बांधकामाची अनेक कामे झालेली आहेत, तसेच आताही चालू आहेत. या कामावर कुणाचेही नियंत्रण नाही. सर्व नियम धाब्यावर बसवून ही कामे चालू आहेत. हे कसे चालते ? त्यामुळे या कामांची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे, असे बांदेकर आणि डिसोजा यांनी सांगितले.