ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांच्या ‘सागरी सुरक्षा : आव्हाने, चिंता आणि पुढील वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन !
पुणे – पाकिस्तान आणि चीनपेक्षा देशांतर्गत असलेला भ्रष्टाचार हा भारताच्या सुरक्षिततेतील सर्वांत मोठा धोका आहे. भ्रष्ट चारित्र्य आणि अमर्यादित स्वार्थ यांमुळे देशाची अतोनात हानी झाली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या पदांवर चारित्र्यवान व्यक्ती असल्या पाहिजेत, अशी अपेक्षा ‘चाणक्य मंडल परिवारा’चे संस्थापक, निवृत्त प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केली. जगात पसरलेला नक्षलवाद आणि इस्लामवादाचा धोका जगासमवेत भारतालाही आहे. नक्षलवादी हे चीनचे, तर इस्लामवादी हे पाकिस्तान आणि बांगलादेशाचे हस्तक आहेत, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. ‘अनुबंध प्रकाशना’च्या वतीने ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांच्या ‘सागरी सुरक्षा : आव्हाने, चिंता आणि पुढील वाटचाल’ या भाग १, भाग २, भाग ३ या तीन पुस्तकांचे प्रकाशन २८ नोव्हेंबर या दिवशी धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. पुणे येथील ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
‘बेळगाव तरुण भारत’चे संपादक किरण ठाकूर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर ‘नॅशनल शिपिंग बोर्ड’चे माजी अध्यक्ष प्रदीप रावत यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘अनुबंध प्रकाशन’चे संचालक अनिल कुलकर्णी मंचावर होते.
धर्माधिकारी पुढे म्हणाले की, एकसंघ राष्ट्राच्या निर्मितीसाठी देशातील जनतेने एक होणे आवश्यक आहे. तेव्हाच राष्ट्रीयत्व बळकट होईल. सागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून केलेल्या उपाययोजनांची माहिती ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांच्या पुस्तकातून मिळत असून त्यांनी संपूर्ण जीवन भारताच्या सुरक्षेच्या विषयांवर अभ्यास करण्यासाठी वाहिलेले आहे.
पुस्तक लिखाणामागील भूमिका विशद करतांना ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी सागरी सुरक्षेचा इतिहास, वर्तमानातील धोके, राष्ट्रीय सुरक्षा, महासागरी व्यूहरचनेची उत्क्रांती, बाह्य आणि अंतर्गत धोके, सागरी सुरक्षा आणि भारतीय तटरक्षक, समुद्री परिस्थिती, पायाभूत सुविधा, नियोजन, वित्त व्यवस्थापन अशा विविध सूत्रांवर लिखाण केले असल्याचे सांगितले. ‘देशासमोरील धोके ओळखून सैन्यदलांना अत्याधुनिक युद्ध सामुग्री मिळणे आवश्यक आहे’, असे संपादक श्री. किरण ठाकूर यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरक्षेच्या दृष्टीने सागरी सत्ता बनण्याचे आत्मभान जागृत केले ! – प्रदीप रावतप्रदीप रावत म्हणाले की, देशाला मोठ्या प्रमाणावर सागरी किनारा लाभला असूनही सागरी सत्ता बनण्याची आकांक्षा नव्हती. त्यामुळे समुद्रमार्गे भारतावर अनेक आक्रमणे झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरक्षेच्या दृष्टीने सागरी सत्ता बनण्याचे आत्मभान जागृत केले. समुद्रमार्गे आज देशाची कोंडी होत आहे. अशा परिस्थितीत होत असलेले धोरणात्मक पालट आश्वासक वाटत आहेत. |