अंदमान आणि राजबंदीवानांचे पुतळे !

अंदमानमध्‍ये राजबंदिवानांचे पुतळे

अंदमानच्‍या सेल्‍युलर कारागृहाचा कारागृह अधीक्षक आणि कर्दनकाळ डेव्‍हीड बॅरी हा स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍यासमोर इतर राजबंदिवानांना अपमानित करत असे. एकदा वीर सावरकर राजबंदिवानांना म्‍हणाले, ‘माझ्‍यासमोर तुम्‍हांस तो बंदीपाल अश्‍लील भाषा बोलला; म्‍हणून तुम्‍ही मनात संकोच करू नका आणि धीर खचू देऊ नका. आज ते तुम्‍हांस भिकारडे म्‍हणत आहेत, उद्या मला म्‍हणतील.

मंजिरी मराठे

आज आपण अवश (लाचार) आहोत. आज आपला या जगतात अपमान होईल; पण असाही एक दिवस क्‍वचित् येईल की, अंदमानच्‍या याच कारागारात राजबंदिवानांचे पुतळे उभारले जातील आणि येथे हिंदुस्‍थानाचे राजबंदीवान रहात असत; म्‍हणून सहस्रो लोक यात्रेस लोटतील !’ स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे वरील शब्‍द केव्‍हाच सत्‍यात उतरले आहेत.

वर्ष १९८३ मध्‍ये स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या जन्‍मशताब्‍दीनिमित्त मुंबईतील पार्ल्‍याच्‍या ‘लोकमान्‍य टिळक सेवा संघ’ या संस्‍थेने ‘गोविंद दत्तात्रय गोखले चॅरिटेबल ट्रस्‍ट’च्‍या सहयोगाने सेल्‍युलर कारागृहासमोरील वीर सावरकर उद्यानात स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचा पहिला पुतळा उभारून त्‍यांना मानवंदना दिली. याच उद्यानात प्रातिनिधिक स्‍वरूपात इंदूभूषण राय, पंडित राम रक्‍खा, मोहन किशोर नामदास, बाबा भानसिंग, महावीर सिंग, मोहित मोईत्रा या हुतात्‍म्‍यांचेही पुतळे आहेत.

वीर सावरकर यांचे बोल खरे होणे 

अंदमानातील वीर सावरकर आंतराष्‍ट्रीय विमानतळावर स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा नव्‍हता. केवळ एक जुने झालेले चित्र होते. हे लक्षात येताच फेब्रुवारी २०१२ मध्‍ये मुंबईतील दादरच्‍या ‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारका’च्‍या वतीने विमानतळ प्राधिकरणाला स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचा अर्धपुतळा भेट देण्‍यात आला होता. तो आता नवीन विमानतळावर बसवण्‍यात आला आहे.

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे शब्‍द खरे ठरले आहेत. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍यासहित काही राजबंदिवानांचे पुतळे अंदमानमध्‍ये उभारले गेले आहेत आणि ज्‍या राजबंदिवानांचे रक्‍त अन् अश्रू यांचे सिंचन सेल्‍युलर कारागृहाच्‍या भूमीला झाले आहे, त्‍या भूमीला अभिवादन करण्‍यासाठी सहस्रोंच्‍या संख्‍येने भारतीय यात्रेकरू अंदमानला सतत येत असतात.

– मंजिरी मराठे, कोषाध्‍यक्षा, स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारक, मुंबई. (२२.११.२०२४)