रायचूर (कर्नाटक) येथील श्री क्षेत्र कुरवपूर (कुरुगड्डी) : एक प्राचीन दत्तक्षेत्र !

श्रीक्षेत्र कुरवपूर हे एक प्राचीन दत्तक्षेत्र आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तात्रेयांचा प्रथम अवतार, असे मानले जाते. त्यांचा जन्म आंध्रप्रदेशामध्ये पीठापूर येथे झाला. वयाची १६ वर्षे झाल्यानंतर ते पीठापूर येथून निघाले. संपूर्ण भारतभर भ्रमण करून ते कुरवपूर या ठिकाणी आले. ही त्यांची कर्मभूमी. ‘कुरवपूर’ हे त्यांचे अक्षय निवासस्थान होय.

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, या मंत्राचा उच्चार होताच क्षणी नजरेसमोर येते ते ‘श्री क्षेत्र कुरवपूर’ ! या मंत्राचा उगम ज्या ठिकाणी झाला, तेच ते प्राचीन स्थान. ही तपोभूमी मानली जाते.

श्रीपाद श्रीवल्लभ

१. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म

दत्तभक्तांचा वेद समजला जाणार्‍या ‘गुरुचरित्र’ या ग्रंथातील अध्याय ५ ते १० हे प्रथम दत्तावतार यांच्याविषयी आहेत. भगवान दत्तात्रेय यांनी सुमती आणि आपलराज यांना दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांच्या पोटी जो प्रथमावतार संपन्न केला, ते श्रीपाद वल्लभ होय. वयाच्या १६ व्या वर्षी माता-पित्यांचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ प्रथम गोकर्ण महाबळेश्वरला गेले आणि तेथून श्रीशैल पर्वतावर जाऊन तेथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले. नंतर फिरत फिरत ते कुरवपूर येथे आले. तेथे २२ वर्षे तपश्चर्या करून इथूनच ते अंतर्धान पावले.

२. कुरवपूर क्षेत्राविषयी…

कुरवपूर क्षेत्र स्वातंत्र्यापूर्वी निजाम राज्यात होते. सध्या ते कर्नाटकात रायचूर जिल्ह्यात येते. कुरुगुड्डी या छोट्या खेड्याजवळ कृष्णा नदीचे नैसर्गिकरित्या २ भाग झाले आणि पुढे ते एकत्र आले आहेत. जेथे कृष्णेचे दोन भागांत विभाजन झाले आहे, त्या भागाला ‘कुरुगुड्डी बेट’ म्हणतात आणि हेच ते श्रीपाद श्रीवल्लभांचे स्थान ! याच बेटावर दगडांच्या गुहेत श्रीपाद श्रीवल्लभ तपश्चर्या करत आणि या गुहेसमोरील मोठ्या औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करत. बेटावरील २-४ घरी माधुकरी (भिक्षा) मागून ते निर्वाह करत.

सकाळी उठल्यावर नदीवर स्नान करून ते सूर्यनमस्कार घालीत. ते ज्या शिळेवर उभे राहून सूर्यनमस्कार घालीत, त्या वेळी त्यांची शिळेवर पडणारी छाया अजूनही स्पष्ट दिसते. त्यांच्या पावलांच्या खुणाही त्या शिळेवर दिसतात. हा परिसर मोठा रम्य आहे. पादुका, मंदिर, आजूबाजूची वनश्री हे सर्व मन प्रसन्न करणारे, त्याचप्रमाणे अंतर्मुख करणारे आहे. कुरवपूर हे स्थान कित्येक वर्षे अज्ञातच होते;  पण श्रीगुरूंच्या शोधात आलेल्या परमहंस परिव्राजकाचार्य (प.प.) वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांनी या स्थानाचा शोध लावला. कुरवपूर हे आंध्रप्रदेश आणि कर्नाटक यांच्या सीमेवरील रायचूर जिल्ह्यातील एक खेडे आहे. चारही बाजूंनी कृष्णामाईच्या प्रवाहांनी वेढलेले हे बेट आहे. पावसाळ्यात कृष्णामाईच्या पुरामुळे आणि उन्हाळ्यात न सोसणार्‍या कडक उन्हामुळे इथे जाणे त्रासदायक होते. डिसेंबर ते फेब्रुवारी हे तीनच मास प्रवासाला सुखकारक असतात.

३. ‘आश्विन कृष्ण द्वादशी’ ही तिथी श्रीपाद श्रीवल्लभ यांचा तिरोहित होण्याचा, म्हणजेच निजानंदगमनाचा दिवस. या दिवशी कुरवपूरला मोठा उत्सव असतो.

४. श्रीपाद मंदिर

श्रीपाद मंदिर

श्रींचे मंदिर ऐसपैस आहे. मंदिराच्या भव्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन दगडी कट्टे आहेत. त्याच्या शेजारी दगडी भिंती आहेत. महाद्वारावर कमान आहे. तिथे वाकून नम्रपणे हस्तस्पर्श करून आत गेल्यावर दोन्ही बाजूस पहारेकर्‍यांना बसण्याकरता दोन देवड्या आहेत. भव्य अश्वत्थ (पिंपळ), कडुनिंब वृक्ष असून त्यांना दगडी पार बांधला आहे. पाराच्या उत्तर बाजूच्या दोन्ही कोपर्‍यांवर घडीव दगडी वृंदावने आहेत. या पारावर दक्षिणाभिमुख दोन मंदिरे आहेत. त्यातील एका मंदिरात दक्षिणाभिमुख काळ्या शाळिग्राम शिळेची मारुतीची रेखीव मूर्ती, तर दुसर्‍या मंदिरात केशवमूर्ती आणि शिवलिंग पादुका आहेत. या पारासमोरच मुख्य पूजास्थान असून तेथेच श्रीपाद श्रीवल्लभ जप-तप-अनुष्ठानादी कर्मे करत असत. यालाच ‘निर्गुण पीठ पार’ म्हणतात. महाराज स्वत: त्या ठिकाणी अदृश्य असल्यामुळे निराळ्या स्वरूपात पादुका नाहीत. याच ठिकाणी दिव्य अनुभव मिळतात. अर्थात् त्यासाठी तेवढी साधना आवश्यक आहे.

५. पुरातन वटवृक्ष 

श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादुका

ही श्रीपाद वल्लभ यांची अनुष्ठानाची जागा आहे. सदर वृक्ष साधारणपणे ९०० वर्षांपूर्वीचा आहे. याच्याच ढोलीमध्ये मोठा सर्प आहे. याच ठिकाणी सोलापूरच्या भक्त मंडळींनी श्रीपाद वल्लभांची मूर्ती आणि पादुका स्थापन केल्या आहेत.

६. प.प. टेंबेस्वामी गुहा

प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी

ही गुहा निसर्गनिर्मित असून प्राचीन आहे. या ठिकाणी प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी वर्ष १९१० मध्ये चातुर्थाश्रमीय चातुर्मास संपन्न केला. आता या ठिकाणी बांधकाम होऊन शिवमंदिर बांधले आहे. या ठिकाणी प.प. टेंबेस्वामी महाराजांनी प्रत्येक संकटावर रामबाण उपाय असलेल्या ‘घोरकष्टोधरण स्तोत्रा’ची रचना केली. प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) यांना याच ठिकाणी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या १८ अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला.

महाराज येथे तपश्चर्येला बसत. रांगत रांगत आत जाता येईल एवढी चिंचोळी वाट आहे. आतमध्ये केवळ एक माणूस बसू शकेल, एवढी या गुहेची उंची आणि जागा आहे. फारशी गर्दी आणि मनुष्य स्पर्श न लाभलेल्या कुरवपुरच्या वातावरणात एक पावित्र्य अन् चैतन्य भरलेले आहे. ते तिथे जाणवतेच. याच ठिकाणी श्री पाचलेगावकर महाराजांना श्रीपाद वल्लभ यांचा साक्षात्कार झाला.

७. तपस्वी व्यक्तींचे ठिकाण

पंचदेव पहाड या गावाजवळ दत्त उपासक विठ्ठल बाबांनी ‘वल्लभपूरम’ नावाचा आश्रम स्थापन केला आहे. या आश्रमात निवासाची आणि भोजनाची व्यवस्था आहे. स्वत:च्या गाडीने कुरवपूरला जाणार्‍यांसाठी या आश्रमात गाडी ठेवण्याची व्यवस्था आहे. वल्लभपूरम या आश्रमात श्रीपाद वल्लभ स्वामींचा दरबार आहे. कुरवपूर येथे अनेक महात्मे येऊन गेल्याने अतिशय पावन झाले आहे. प.प. टेंबेस्वामी, प.प. श्रीधरस्वामी, प.पू. नानामहाराज तराणेकर, प.पू. पोखरापूरकर महाराज, प.प. गुळवणी महाराज, प.पू. कवीश्वर, प.पू. मामा देशपांडे इत्यादी तपस्वी व्यक्तींनी या ठिकाणी मुक्काम केला आहे.

८. श्री गुरुचरित्रातील कुरवपूर माहात्म्य

श्री गुरुचरित्राच्या १० व्या अध्यायात श्रीपाद श्रीवल्लभ यांचा प्रिय शिष्य वल्लभेष नवस फेडण्यासाठी कुरवपूरला जात असतांना वाटेत चोरांनी अडवून त्याची हत्या केली. त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ यांनी अवतार संपल्यानंतरही ते त्यांच्या भक्तांच्या रक्षणासाठी तिथे प्रकटले आणि त्यांनी त्यांचा शिष्य वल्लभेषला परत जिवंत केले. ही घटना घडली ते ठिकाण म्हणजे मंथनगड आहे. हे क्षेत्र कुरवपूरपासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. आज त्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांचे मंदिर आहे.

(साभार : ‘दत्तमहाराज’ संकेतस्थळ)