‘श्री क्षेत्र कर्दळीवन’ दुर्गम पण एक जागृत तपस्थान !

आंध्रप्रदेशमधील श्रीशैल्यम्-पाताळगंगा येथील ‘कर्दळीवन’ स्थानाला दत्त संप्रदायात महत्त्वाचे स्थान आहे. अन्य तीर्थक्षेत्रांप्रमाणे कर्दळीवनाची परिक्रमा सहज किंवा थोड्याशा परिश्रमाने साधणारी नाही. या स्थानाविषयी विशेष माहितीही सहजासहजी उपलब्ध नाही. 

कर्दळीवनातील दत्त चरण पादुका

१. कर्दळीवन स्थान माहात्म्य

कर्दळीवन हे दत्तगुरूंचे गुप्त स्थान आणि श्री स्वामी समर्थ यांचे प्रकटस्थान ! श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांच्या अवतारकार्यात त्याला विशेष महत्त्व आहे. अक्कलकोट स्वामींच्या दत्तावतारपणाला पुष्टी देते, ते त्यांनी ‘आपण कर्दळीवनातून आलो’, असे त्यांचे सांगणे. अन्य अनेक ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक संदर्भ या स्थानाला आहेत. असे असूनही कर्दळीवनात जाणार्‍यांचे प्रमाण अल्प आहे. दुर्गमता, सोयीसुविधांचा अभाव; भीती वाटावी, असे प्रवाद यांमुळे तेथे जायला कुणी धजावत नाही. ‘दत्तगुरूंच्या मनात असले, तरच भाविकाला ही दुर्लभ परिक्रमा घडते’, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

प्राचीन काळापासून कर्दळीवन हे सिद्ध, योगी, मुनी आणि ऋषि यांचे अत्यंत आवडते अन् एकांतात तपश्चर्या करण्यासाठी अनुकूल ठिकाण आहे. कर्दळीवन परिसरात प्रवेश करताच तेथील दिव्यत्वाची अनुभूती तात्काळ येते आणि अष्टसात्त्विक भाव जागृत होतात. सर्व परिसरात दिव्य दैवी स्पंदने भरून राहिली आहेत. शरिरातील सुप्त आध्यात्मिक शक्ती जागृत होतात. अंतर्मनामध्ये चैतन्याचा आविष्कार होतो. एक विलक्षण जाणीव अंतरंगामध्ये पुलकित होते. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष दत्तप्रभूंचा वास आहे, जेथे त्यांचे सर्व अवतार येऊन मिळतात आणि गुप्त रूपात वास करतात, त्या कर्दळीवनाचे माहात्म्य किती असेल, याची कल्पनाच करता येणार नाही.

कर्दळीवनातील खडकावर स्वामी समर्थ यांचे उमटलेले चरण

२. कर्दळीवन परिक्रमा मार्ग

अ. पहिला मार्ग म्हणजे श्रीशैल्य येथे जाऊन तेथून होडीने किंवा यांत्रिक बोटीने २४ कि.मी.चा प्रवास करून व्यंकटेश किनारी जाणे आणि तेथून कर्दळीवनात प्रवेश करणे.

आ. दुसरा मार्ग म्हणजे भाग्यनगर येथून श्रीशैल्य येथे येत असतांना श्रीशैल्यम्च्या अलीकडे साधारण १० ते १२ कि.मी.वर अक्कमहादेवी गुंफेकडे जाणारा मार्ग आहे; पण हा मार्ग प्रचलितच नाही.

व्यंकटेश किनार्‍यावर एका साधू महाराजांनी झोपडी बांधली असून तेथेच कोळी समाजातील १० ते १२ कुटुंबियांची कच्ची घरे आहेत. कर्दळीवनात जाणार्‍या सर्व यात्रेकरूंना येथे सर्व प्रकारचे साहाय्य मिळते. आवश्यकता भासल्यास सामान वहाण्यासाठी सेवेकरी मिळतात, तसेच वाट दाखवण्यासाठी मार्गदर्शकही मिळू शकतात; मात्र या सर्वांची भाषा तेलुगू आहे. एखाद्याला तोडके मोडके हिंदी आणि इंग्रजी येते. तेथील स्वामी आणि इतर व्यक्ती आपल्याला आवश्यकतेप्रमाणे साहाय्य उपलब्ध करून देतात.  श्रीअक्कमहादेवी गुहेपासून पश्चिमेकडे कर्दळीवनातील दत्तप्रभु आणि स्वामी समर्थांच्या मूळ स्थानाकडे जायचा रस्ता आहे. हा कर्दळीवनातील दुसरा टप्पा ६ कि.मी. अंतराचा आहे. हा रस्ता बहुधा सरळ आहे. मध्ये थोडाफार चढ-उतार येतो; मात्र या रस्त्यावर अतिशय घनदाट अरण्य आहे. अगदी दिवसासुद्धा सूर्यकिरणे भूमीवर पोचू शकत नाहीत. या रस्त्याचा प्रारंभ होतांनाच अक्कमहादेवीच्या गुहेजवळ पूर्वेकडे एक विस्तीर्ण पठार आहे. तेथे एक अत्यंत जुने वडाचे झाड आहे. हा वृक्ष ५ सहस्र वर्षांपूर्वीचा असावा, असा अंदाज आहे.

३. आध्यात्मिक शक्ती केंद्रांपैकी एक अद्वितीय केंद्र !

कर्दळीवनाची भूमी ही खरोखरच ध्यान, धारणा, तपश्चर्या, साधना करण्यासाठीच आहे. कर्दळीवन हे संपूर्ण जगातील फार मोठ्या आध्यात्मिक शक्ती केंद्रांपैकी एक अद्वितीय केंद्र आहे. या ठिकाणी आकर्षण शक्ती पुष्कळ अधिक प्रमाणात आहे. तेथे जाण्यासाठी आणि एकदा गेल्यावर पुन्हा जाण्यासाठी चांगलीच ओढ लागते. कर्दळीवन ही देवभूमी आहे. तिथे जाण्यासाठी तीव्र साधना आणि उच्च योग आपल्या भाग्यात असणे आवश्यक आहे, असे म्हटले जाते. कलियुगात प्रत्येकाने एकदा तरी कर्दळीवन यात्रा केली पाहिजे. स्वामी समर्थांच्या प्रत्येक भक्ताने स्वामींचे मूळ स्थान असलेल्या कर्दळीवनास भेट देऊन त्यांच्या दैवी स्पंदनांचा अनुभव घेतला पाहिजे.

– श्री. रोहन उपळेकर, पुणे.

(श्री. रोहन उपळेकर यांच्या फेसबुकवरून साभार)