ISRO Chief Somanath : भारतियांना वर्ष २०४० पर्यंत चंद्रावर उतरवण्याचे आमचे ध्येय ! – इस्रोचे प्रमुख डॉ. एस्. सोमनाथ

इस्रोचे प्रमुख डॉ. एस्. सोमनाथ

झुंझुनू (राजस्थान) – भारतियांना वर्ष २०४० पर्यंत चंद्रावर उतरवण्याचे आमचे ध्येय आहे. त्यासाठी आपल्याला अवकाश स्थानक उभारावे लागेल; कारण चंद्रावर मानवाला पाठवण्यासाठी मध्यवर्ती माध्यम असणे आवश्यक आहे. त्यासाठी सूक्ष्म गुरुत्वाकर्षण संशोधन आणि अनेक विशेष अवकाश मोहिमांची उद्दिष्टे साध्य करावी लागतील. आम्ही पुढील ५० ते ६० वर्षांच्या भविष्यासाठी कार्यक्रमांची रूपरेषा सिद्ध केली आहे. सरकारने यासाठी ३० सहस्र कोटी रुपयांचा निधीही घोषित केला आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोचे प्रमुख डॉ. एस्. सोमनाथ यांनी दिली. ते येथील ‘बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पिलानी इन्स्टिट्यूट’मध्ये आयोजित दीक्षांत समारंभात बोलत होते.

डॉ. सोमनाथ यांनी मांडलेली सूत्रे

१. अंतराळ पर्यटनाचे क्षेत्र लक्षणीयरित्या उदयास येईल !

अमेरिकी उद्योगपती इलॉन मस्क चंद्रावर मानव पाठवण्याची आणि मंगळावर वसाहत  स्थापन करण्याची योजना आखत आहेत. लाखो लोकांसाठी मंगळावर वसाहत बांधण्याची त्यांची योजना आहे आणि लोकांना तिकीट घेऊन तेथे जाता येईल. मला वाटते अंतराळ पर्यटनाचे क्षेत्र लक्षणीयरित्या उदयास येईल. या क्षेत्रात भारताची प्रचंड क्षमता आहे.

२. ५० सहस्रांहून अधिक उपग्रह हे दूरसंचार सेवा आणि इंटरनेट सेवा देत आहेत !

अंतराळात प्रवेश करणे आणि त्याचे नियम जाणून घेणे पूर्वीसारखे अवघड राहिलेले नाही. आता अंतराळात प्रवेश करणे फारसोपे झाले आहे. आजकाल कुणीही उपग्रह प्रक्षेपित करू शकतो. हे विद्यापिठे आणि संस्था यांंमध्येही केले जाऊ शकते अन् उपग्रह प्रक्षेपणाचा खर्च इतका अल्प झाला आहे की, आज अंतराळात अनुमाने २० सहस्र उपग्रह आहेत. ५० सहस्रांहून अधिक उपग्रह हे दूरसंचार सेवा आणि इंटरनेट सेवा देत आहेत, जो खरोखरच आश्‍चर्यकारक आकडा आहे.