परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे धाकटे बंधू दिवंगत डॉ. सुहास बाळाजी आठवले यांनी शालेय जीवनात लिहिलेला निबंध

द्रव्येण सर्वे वशाः ।

सुहास आठवले

‘द्रव्येण सर्वे वशाः ।, म्हणजे ‘धनाने सर्वजण वश होतात (कह्यात राहतात).’

कोणतीही म्हण किंवा रूढ वचन हे पूर्ण सत्य असते, असे नाही. कोणताही नियम घेतला, तरी त्यास अपवाद असणारच. उदाहरणार्थ वरील वचन घ्या. ‘सर्वजण पैशामुळे वश होतात’, असा त्याचा अर्थ आहे; पण काही स्वाभिमानी माणसे पैशापेक्षा माणूसकीस अधिक महत्त्व देतात. ते पैशासाठी आपला स्वाभिमान गहाण टाकण्यास तयार होत नाहीत. निवडणुकीच्या वेळी काही उमेदवार मतदारांना पैशाचे आमिष दाखवितात; परंतु सत्प्रवृत्त मतदार या आमिषास भीक घालत नाहीत.

अकबर हा फार चतुर राजा होता. त्याने पाहिले की, राजपुतांच्या साहाय्याशिवाय आपल्या राज्यास चिरस्थायित्व प्राप्त होऊ शकणार नाही. त्याने अनेक राजपूत सरदारांना आणि राजांना पदव्या देऊन, मानाच्या जागा देऊन वश करून घेतले. काहींना आपल्या नवरत्न दरबारात स्थान दिले; परंतु चितोडचा राणा संग्रामसिंह असा एक वीर बहाद्दर निघाला की, तो दिल्लीश्वराच्या देणगीस भाळला नाही. हालअपेष्टेत दिवस कंठून तो आपल्या मायभूच्या स्वातंत्र्य रक्षणार्थ झटला.

दिवंगत सुहास बाळाजी आठवले यांच्या निबंधाच्या हस्ताक्षराचे छायाचित्र    

औरंगजेबाने देखील छत्रपती शिवाजी महाराजांवर ‘दाम’नीतीचा प्रयोग केला होता; पण स्वदेशप्रीतीने आणि स्वाभिमानाने भारलेल्या शिवरायांनी पैशाच्या लोभासाठी त्याची सरदारकी पत्करण्याचे साफ नाकारले.

पैसा हे सारसर्वस्व (सर्व काही) नव्हे किंवा सारेचजण पैशाने वश होत नाहीत. ही गोष्ट खरी असली, तरी सामान्यतः सामान्यजन द्रव्यविवश होतात, हा नित्याचा अनुभव आहे. कचेरीतील कारकुनाच्या हातावर दक्षिणा टाकणार्‍या लक्ष्मीपुत्राचे काम चटकन होते; परंतु माध्यान्हाची पंचाईत पडणार्‍या शेतकर्‍यास तगाई (शेतकर्‍याला साहाय्यासाठी सरकारकडून किंवा जमीनदाराकडून कर्जाऊ मिळणारा पैसा [फारसी शब्द – तकावी]) मिळविण्याकरिता कचेरीत सारा दिवस गारद करावा (घालवावा) लागतो, तरीपण त्याचे काम पूर्ण (फत्ते) होत नाही. नगरपालिकेच्या निवडणुकीत पैशाची खैरात करून अप्रामाणिक आणि अयोग्य उमेदवार, निर्धन; पण योग्य उमेदवाराचा प्रचंड बहुमताने पराभव करून निवडून येतो. एखादा गरीब पक्षकार आपली बाजू सत्य असूनही कायदेकुशल वकील पैशाच्या अभावी गुंतवू न शकल्याने पराभूत होतो आणि त्याचा श्रीमंत प्रतिपक्षी पैशाचा पूर वाहवून विजयी होतो. व्यवहारांतील कटु सत्य आहे ते असे. कोणत्याही वस्तूचा बरेवाईटपणा त्या वस्तूचा उपयोग करण्यावर अवलंबून आहे. पैसा एकच वस्तू; परंतु ती दीनांचे दारिद्र्य नष्ट करू शकते आणि अप्रामाणिकपणास प्रोत्साहन देऊ शकते. म्हणून पैशाचा चांगला तेवढाच उपयोग करणे समाजहिताच्या दृष्टीने इष्ट आहे. अर्थाचा प्रभाव जाणूनच त्याला चार पुरुषार्थांत सूज्ञांनी स्थान दिले आहे. निर्धन मनुष्यास व्यवहारात पदोपदी अडचणी येतात. त्याची वारंवार कुचंबणा होते. त्याच्यावर अपमानाचे अनेक प्रसंग येतात. निर्धनता, म्हणजे प्रगतीपथांत उभा राहिलेला प्रचंड डोंगर होय; म्हणूनच प्रत्येकाने आपली आर्थिक बाजू सबळ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनुष्याजवळ पैसा नसला की, त्याचे मित्र त्यास सोडून जातात. त्याचे नोकर चाकर त्याचा मानमरातब राखत नाहीत. खालील काव्यपंक्तीतील अनुभव कोणाच्या परिचयाचा नाही ?’

माता निन्दति नाभिनन्दति पिता भ्राता न सम्भाषते
भृत्यः कुप्यति नानुगच्छति सुतः कान्ता च नालिङ्गते ।

अर्थप्रार्थनशङ्कया न कुरुते सम्भाषणं वै सुहृत्
तस्मात् द्रव्यमुपार्जयस्व सुमते द्रव्येण सर्वे वशाः ।।

अर्थ : माता निंदा करते, पिता सन्मान करत नाही, भाऊ बोलत नाही, नोकर रागावतो, मुलगा अनुकरण करत नाही (ऐकत नाहीत), पत्नी जवळ येत नाही. पैसे मागण्याच्या शंकेने मित्र बोलत नाही. म्हणून हे चांगली बुद्धी असणार्‍या माणसा, धनार्जन कर (धन मिळव), धनाने सर्वजण वश होतात (कह्यात राहतात).

– सुहास बाळाजी आठवले