Gurpatwant Singh : (म्हणे) ‘शीख जागे झाले नाही, तर सरकार श्रीगणेश स्थापन करेल !’ – गुरपतवंत सिंग पन्नू

देशातील विमानतळांवर शीख कर्मचार्‍यांना कृपाण बाळगण्यास बंदी

गुरपतवंत सिंग पन्नू

न्यूयॉर्क (अमेरिका) – ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने १७ नोव्हेंबर या दिवशी अमृतसर आणि चंदीगड विमानतळ बंद करण्याची धमकी दिली. ‘भारत सरकारने कृपाण बाळगण्यावर बंदी घातली आहेे. यापुढे आणखी निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. मग श्री ग्रंथसाहिब (धर्मग्रंथ) ठेवू दिले जाणार नाही. हे भारत सरकार सर्व शिखांना पवित्र धागा घालण्यास भाग पाडेल. प्राण वाचवण्यासाठी शीख बांधवांना त्यांच्या घराबाहेर श्री गणेशाची प्रतिष्ठापना करावी लागेल’, असा आरोप पन्नू याने केला आहे. पन्नू याने एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित केला आहे. यात त्याने भारत सरकारला धमकी दिली आहे.

३० ऑक्टोबर या दिवशी नागरी विमान वाहतूक विभागाने ‘भारतातील विमानतळांवर काम करणार्‍या शीख कर्मचार्‍यांना सुरक्षेच्या दृष्टीने कृपाण बाळगता येणार नाही’, असा आदेश प्रसारित केला आहे. या आदेशावरूनच पन्नू याने धमकी दिली आहे.

पन्नू याने दिलेल्या धमक्या

१. शस्त्रास्त्र चालवण्याचा सराव करा !

भारतीय राज्यघटना शीख धर्माला हिंदु धर्माचा भाग मानते. भारतीय राज्यघटनेनुसार सुवर्ण मंदिराच्या आत आक्रमण झाले, तसेच शिखांचा नरसंहार झाला.  पंजाबमध्ये प्रतिमहा १५ ते २० शेतकरी आत्महत्या करतात. हात जोडून स्वातंत्र्य कधीच मिळत नाही आणि कायदे मागे घेतले जात नाहीत. शारीरिक बळासाठी शस्त्रास्त्र चालवण्याचा सराव करा.

२. (म्हणे) ‘शिखांना त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढावे लागेल !’

१७ नोव्हेंबरला विमानतळावर ट्रॅक्टर आणि उडणार्‍या ड्रोनसह रस्ते अडवा. हा निषेध म्हणजे शीख समुदायाच्या अस्तित्वाला असलेल्या धोक्याची जगाला जाणीव करून देण्याचा एक मार्ग आहे. शिखांना त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढावे लागेल, जसे त्यांचे पूर्वज लढले होते.

संपादकीय भूमिका

  • अमेरिकेत ट्रम्प सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे भारताने पन्नूवर कारवाई करून त्याला भारताच्या स्वाधीन करण्यासाठी आतापासून मागणी केली पाहिजे !
  • शिखांमध्ये जाणीवपूर्वक हिंदूंविषयी द्वेष पसरवण्याचा हा प्रयत्न देशातील शीख संघटना आणि त्यांचे नेते यांनी समोर येऊन उघडा पाडला पाहिजे !