हिंदु जनजागृती समितीची चेतावणी
मुंबई – कॅनडाच्या ब्रॅम्प्टन भागातील हिंदु मंदिरावर ‘सिख फॉर जस्टिस’ या संघटनेने आणि खलिस्तान्यांनी ४ नोव्हेंबरला आक्रमण केले; मात्र या हिंसक आक्रमणकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच पाठीशी घालण्याचा प्रकार कॅनडा सरकारने केला. याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. यापूर्वीही कॅनडामध्ये मंदिरांवर आक्रमणे झाली आहेत. ‘कॅनडा सरकारने सर्व आक्रमणे रोखण्यासाठी उपाययोजना करून सर्व आक्रमणकर्त्यांवर कठोर कारवाई करावी’, अशी आमची मागणी आहे. अन्यथा कॅनडा सरकारला जागे करण्यासाठी भारतातील त्यांच्या दूतावासासमोर हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीने दिली आहे.
१. भारतीय उच्चायुक्त हे कॅनडातील मंदिराच्या भेटीसाठी जाणार आहेत, हे ठाऊक असतांनाही त्यांच्या आणि मंदिराच्या सुरक्षेसाठी किंवा आक्रमण होऊच नये; म्हणून कॅनडा सरकारने कोणतीही ठोस कृती केलेली नाही. त्यामुळे या आक्रमणाला कॅनडा सरकारची मूकसंमती होती का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
२. खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येनंतर कॅनडामध्ये हिंदू, तसेच मंदिरांवरील आक्रमणे रोखण्यात कॅनडा सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे भारत सरकारने हे सूत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडून कॅनडा सरकारवर कारवाई करण्यासाठी दबाव आणला पाहिजे, अशी आमची भारत सरकारकडे मागणी आहे.
३. हल्लेखोर संघटनेचे भारतात जे कुणी पाठीराखे असतील, त्यांच्यावर भारत सरकारने कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.