खोट्या धमकीचे ‘कॉल’ हा विमान वाहतूक सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे. कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटन येथे रहाणार्या खलिस्तानी घटकांकडून हे मोठ्या प्रमाणावर घडत आहे. या खोट्या धमक्यांचे कॉल/ संदेश/ संगणकीय पत्रे यांसह ‘एक्स’, फेसबुक या सामाजिक माध्यमांतून येत आहेत. ही सर्व सामाजिक माध्यमे अमेरिकेमध्ये आहेत आणि जगात कार्यरत आहेत.
सामाजिक माध्यमांनी सहकार्य करावे !
‘एक्स’, फेसबुक यांसह विविध सामाजिक माध्यमांतून भारताला अशा खोट्या धमक्या मिळत आहेत. त्यासंबंधी, तसेच धर्माच्या नावाखाली तरुणांना कट्टरवादी बनवले जात आहे. ‘क्रिप्टो करन्सी’ (आभासी चलन)च्या माध्यमातून होणारी निर्दयी फसवणूक इत्यादी गोष्टी थोपवण्यासाठी या सामाजिक माध्यमांनी सहकार्य केले पाहिजे. या सामाजिक माध्यमांवरच बरीच बनावट (खोटी) खाती आहेत. ती काढणे आवश्यक आहे. याखेरीज प्रत्येक खात्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. भारत आणि भारतासारख्या अन्य देशांना अशा लिखाणापासून सुरक्षित करण्यासाठी कॅनडा, अमेरिका इत्यादी देशांनी कडक नियम बनवले पाहिजेत. अन्यथा उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये राज्य-प्रायोजित अराजकता निर्माण केली जाईल.
कठोर पावले उचलण्याची आवश्यकता !
भारताकडून कठोर निर्बंध लादणे, हा शेवटचा उपाय असेल. चीन, ब्राझीलसह अनेक देशांनी या सामाजिक माध्यमांवर बंदी घातली आहे. आज भारत या माकडचेष्टांनी ग्रासलेला आहे. लवकरच हीच परिस्थिती तथाकथित प्रगत देशांसह इतर अनेक देशांची असेल. विमान वाहतूक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक देशाने सक्रीयपणे सहभाग घेतला पाहिजे. कोणतीही आपत्ती आल्यास अनेक देशांतील नागरिकांवर विपरित परिणाम होईल. खरे तर आज सर्व विमानतळ आणि विमान आस्थापने यांना अधिकाधिक सुरक्षा पुरवण्यासाठी प्रत्येक देशाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे; पण त्या दिशेने काही घडत नाही. यातून काही असामान्य घडण्याची शक्यता नाही. तरीही विमाने दुहेरी पडताळणीसाठी वळवली जात आहेत. यामुळे लाखो डॉलरची आर्थिक हानी होत आहे. अशा खोट्या धमक्यांच्या विरोधात गंभीर पावले उचलण्यासाठी सामाजिक माध्यमांच्या मालकांना योग्य ती समज मिळावी.
– श्री. प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, मुंबई. (३१.१०.२०२४)