अर्थाचा अर्थ, भावार्थ, साधना आणि गुरुकृपा यांचे महत्त्व !

श्री. प्रकाश करंदीकर

१. अर्थाची व्याख्या 

‘एकदा मला विचार करतांना वाटले, ‘अर्थ’ म्हणजे काय ? ‘अर्था’चा अर्थ काय ? आपण एखादा शब्द ऐकल्यावर बुद्धीला चालना मिळते, तेव्हा एक प्रमेय बनते. त्याला ‘अर्थ’ असे म्हणतात. ऐकणार्‍या व्यक्तीच्या स्थितीनुसार तिची बुद्धी तिला अर्थ समजावते.

२. अर्थाचा गुणधर्म 

अर्थाला नेहमी संदर्भ असतो. संदर्भाविना अर्थाला अर्थ नसतो. ‘अर्थ’ हा व्यक्तीला स्थुलातून सूक्ष्माकडे नेतो, म्हणजे शब्द स्थूल असून त्याचा अर्थ सूक्ष्म असतो. शब्दाचा ‘भावार्थ’ हा शब्दाच्या ‘अर्था’पेक्षाही सूक्ष्म असतो. तो भावार्थ जेव्हा समजायला लागतो, तेव्हा अध्यात्मातील शब्दांच्या भावार्थाच्या अतिसूक्ष्म रूपाने अतिसूक्ष्म असलेल्या भगवंताकडे जाता येते आणि त्याचे अस्तित्व अन् जाणीव होऊ लागते.

३. स्थूलदेहातील सूक्ष्म घटकांनी स्थूल देहावर नियंत्रण ठेवणे 

आपल्या स्थूलदेहात सूक्ष्मरूपात असलेल्या घटकांची माहिती घेतल्यास लक्षात येते की, ‘सूक्ष्मातील घटक स्थूल घटकांवर नियंत्रण ठेवतात.’

३ अ. देहातील पोकळ्या : (आपल्या देहात अनेक पोकळ्या आहेत, उदा. हृदयाकाश किंवा चित्ताकाश ! यात ३ प्रकारचे आकाश, म्हणजे पोकळ्या आहेत.

१. भूताकाश म्हणजे स्थुलातील आकाश, म्हणजे शरीर !

२. हृदयाकाश किंवा चित्ताकाश म्हणजे सूक्ष्मातील आकाश, म्हणजे मन !

३. चिदाकाश म्हणजे अतिसूक्ष्मातील आकाश, म्हणजे आत्मा !

३ आ. हृदयाकाश किंवा चित्ताकाश : (चित्ताकाशात आपले मन असते.) मनाच्या ‘जागृती, सुषुप्ती आणि गाढ निद्रा’, या ३ अवस्था असतात. या ३ अवस्था आपल्या अधीन नसतात. त्यांवर आपले नियंत्रण नसते, उदा. व्यक्तीला झोप आल्यास तिला ती आवरता येत नाही. व्यक्ती झोपून उठल्यावर तिची झोप पूर्ण झाली असेल, तर तिला पुन्हा झोप येत नाही. आपल्याला झोपेत पडणारी स्वप्ने आपल्या हातात नाहीत; मात्र साधनेमुळे या तीनही अवस्थांवर नियंत्रण मिळवता येते, म्हणजे मला झोपेची आवश्यकता असल्यास मर्यादित कालावधीसाठी झोप घेता येते. व्यक्तीची साधना वाढल्यावर तिला असलेली झोपेची आवश्यकता न्यून होत जाते आणि तिला थोडीशी झोपही पुरेशी होते.

लोकमान्य टिळक दिवसातील २० – २१ घंटे कार्यरत असत. त्यांना हवी, तेव्हा हवी तितका वेळ झोप घेता येत होती. हे साधनेमुळे साध्य होते.

३ इ. साधनेचे महत्त्व

३ इ १. ‘साधनेमुळे स्वत:च्या प्राणावर नियंत्रण मिळवता येणे’, याविषयी कथा : हिमालयात एक उन्नत सत्पुरुष साधनारत होते. त्यांच्या ‘स्वतःचा अंतकाळ जवळ आला आहे. आता आपण जाणार’, हे लक्षात आल्यावर त्यांनी त्यांच्या शिष्यांना बोलावून सांगितले, ‘‘अमुक या दिवशी अमुक या वेळेला मी देह ठेवणार आहे; पण माझे दहन करू नका. अमुक ठिकाणी माझा देह १ मास ठेवा आणि अमुक दिवशी देहाचे दहन करा.’’ नंतर एक मास झाल्यावर शिष्यांनी त्यांचा देह दहन करण्यासाठी नेला. त्या वेळी त्यांचे काही शिष्य रडू लागले. तेव्हा त्या सत्पुरुषाने स्वतःच्या देहात प्राण आणला आणि ते उठले. ते शिष्यांना म्हणाले, ‘‘असे रडता का ? माझ्याकडून हेच शिकलात का ?’’ नंतर त्यांनी प्राण सोडला. यातून ‘साधनेमुळे आपल्या प्राणावरही नियंत्रण मिळवता येते’, हे शिकता येते.

 ३ इ २. स्वप्नावस्था : स्वप्ने आपल्याला पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तशी पडत नाहीत. यासाठी एका युरोपियन साधकाने स्वप्नांचा अभ्यास केला. ‘स्वप्ने का, कशी आणि केव्हा पडतात ? अन् साधना करून मनावर कसे नियंत्रण मिळवता येते ?’, या संदर्भात प्रयोग केले. त्याने त्याला पाहिजे, तशी स्वप्ने अनुभवली.

यातून ‘सामान्य माणसाच्या अधीन नसलेल्या या ३ अवस्थांवरही साधनेमुळे नियंत्रण येऊ शकते’, हे लक्षात येते. गुरुकृपेच्या शक्तीपाताने साधकाच्या मनावर नियंत्रण येते आणि साधकात आमूलाग्र पालट होतात. साधकाचे मन त्याच्या पूर्णपणे नियंत्रणात रहाते.

४. गुरूंनी दिलेल्या नामाचे सामर्थ्य 

गुरूंनी दिलेल्या नामात त्यांनी केलेल्या तपश्चर्येचे सामर्थ्य असते. ते आपल्याला गुरूंनी दिलेल्या नामातून मिळते. त्या नामात गुरूंचे प्रेम दडलेले असते आणि त्यांचे आशीर्वाद असतात. त्यामुळे आपले कल्याण होते.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अपार कृपेमुळे हे चिंतन झाले आणि त्यांनी ते लिहूनही घेतले’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.

इदं न मम ।’

– श्री. प्रकाश वसंत करंदीकर (वय ६७ वर्षे), फोंडा, गोवा. (५.८.२०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.