फोंडा, २७ ऑक्टोबर (वार्ता.) – हल्ली दीपावलीच्या पूर्वसंध्येला नरकासुर प्रतिमादहनाच्या दिवशी अनेक गोष्टी घडतांना दिसतात. दीपावलीच्या पहाटे अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. आजची मुले दीपावलीच्या पूर्वसंध्येला नरकासुराची प्रतिमा घेऊन रात्री उशिरापर्यंत नाचत असल्याने ती अभ्यंगस्नानाला मुकतात. राज्यातील हे प्रकार अल्प होणे अपेक्षित आहे आणि दिवाळी सणाला एक वेगळे स्वरूप येणे आवश्यक आहे, असे मत मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले आहे. हल्ली गोव्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुर प्रतिमादहन प्रथेचे पालन केले जाते. या पार्श्वभूमीवर मंत्री ढवळीकर बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘दिवाळीच्या १५ ते २० दिवस आधीच युवक आणि लहान मुले नरकासुराची प्रतिमा करायला प्रारंभ करतात. या कालावधीत प्रामुख्याने शाळकरी आणि महाविद्यालयीन मुले यांची शैक्षणिक हानी होते. युवकांना या काळात वाईट व्यसनही लागलेले दिसून येते. मी वर्ष १९९९ मध्ये आमदार झाल्यापासून हे प्रकार अल्प करण्यासाठी प्रयत्न करत आहे. दिवाळी सणाला एक वेगळे स्वरूप देण्यासाठी आम्ही प्रतिवर्षी बांदोडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानात युवक आणि युवती यांना समवेत घेऊन दिवाळी पारंपरिकरित्या साजरी करतो. असे सण सार्वजनिकरित्या पारंपरिक पद्धतीने संपूर्ण राज्यात साजरे केल्यास संस्कृती टिकून राहील. त्याचबरोबर गोव्याचे नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही.’’