नरकासुराचा उदोउदो : विकृत आनंदासाठी कि आनंदी दिवाळीसाठी ?

श्रीकृष्णाने सत्यभामेच्या साहाय्याने नरकासुराचा वध केला, यावर आधारित एक पौराणिक कथा आहे. गोव्यातील दिवाळी उत्सवाची एक अनोखी परंपरा, म्हणजे नरकासुराच्या प्रतिमांची निर्मिती आणि त्यांचे दहन ! उत्सव साजरा करतांना आनंद मिळवणे, हे मुख्य उद्दिष्ट असते; परंतु गोव्यात नरकासुराच्या प्रतिमा आणि त्या अनुषंगाने रात्रभर जो धागडधिंगा चालतो, त्याविषयी काही गंभीर समस्याही आहेत. या समस्यांवर विचार करणे आवश्यक आहे.

नरकासुर दहन कार्यक्रमाच्या प्रसंगाचा एक क्षण

१. रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीप्रदूषण करणे, हा गुन्हा असूनही नरकासुर प्रतिमा स्पर्धांमुळे रात्रभर होणारे ध्वनीप्रदूषण !

सध्या नरकासुराच्या प्रतिमांच्या मोठमोठ्या स्पर्धा आणि त्यामुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणामुळे अनेकांना त्रास होतो. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे निर्देश दिले आहेत, ‘रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीप्रदूषण करणे, हा कायद्याने गुन्हा आहे.’ (यामध्ये राज्यशासनाला ५ दिवस स्थानिक परिस्थितीनुसार रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक लावण्यास मुभा देण्याचा अधिकार आहे.) या आदेशाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे; कारण यामुळे विशेषतः वयोवृद्ध आणि आजारी व्यक्तींना अधिक त्रास होतो. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने योग्य उपाययोजना करून या समस्येवर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या संदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या एका निर्णयामध्ये याविषयी राज्याच्या मुख्य सचिवांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

श्री. नारायण नाडकर्णी

२. दिवाळी उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी प्रशासनाने योग्य पावले उचलणे आवश्यक !

खरे म्हणजे ‘दीपावलीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करून दीप लावून हा उत्सव साजरा करावा’, असे शास्त्र आहे; परंतु उत्सवाच्या काळात होणार्‍या ध्वनीप्रदूषणामुळे अनेकांच्या झोपेत व्यत्यय येतो, ज्यामुळे मानसिक ताण वाढतो. त्यामुळे प्रशासनाने रात्रभर चालणार्‍या कर्णकर्कश ध्वनीक्षेपकांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यामुळे वयस्कर आणि आजारी व्यक्तींना त्रास होणार नाही अन् सर्वजण शांततेत दिवाळी उत्सव साजरा करू शकतील.

३. मद्यपान करून गदारोळ करणार्‍यांवर वचक हवा !

उत्सव साजरा करतांना सर्वांचे हित लक्षात घ्यायला हवे. स्थानिक प्रशासनाने या संदर्भात कठोर नियम लागू करून नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे. खरे म्हणजे उत्सव साजरा करतांना सर्वांनी एकत्र येऊन तो आनंदात साजरा करणे महत्त्वाचे आहे; परंतु अनेक वेळा मद्यपान करून बेफामपणे वागणारे लोक वातावरण बिघडवतात. याखेरीज रात्री मद्यपान करून भरधाव वेगाने चालवल्या जाणार्‍या गाड्यांचे अपघात होत असतात. याचा समाजातील सर्वांना त्रास होतो.

४. ‘दिवाळी म्हणजे वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींचा विजय’, याचा आदर्श समाजात निर्माण करणे महत्त्वाचे !

दिवाळी म्हणजे वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय मिळवणारा उत्सव ! नरकचतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णाने जनतेला त्रास देणार्‍या नरकासुराचा वध केला. त्यामुळे या उत्सवाच्या निमित्ताने नरकासुराचा उदो उदो करण्यापेक्षा श्रीकृष्णाला प्राधान्य देणे अधिक योग्य ठरेल. यामुळे उत्सवाची खरी भावना जिवंत राहील आणि समाजातील एकता वाढेल. आपण सर्वजण उत्सव कशासाठी साजरा करतो ? आनंद मिळवण्यासाठी ! जनतेला त्रास देऊन विकृत आनंद मिळवण्यात काय अर्थ आहे ?

उत्सव म्हणजे आनंद आणि प्रकाश यांचा अनुभव असतो. त्यामुळे अंधार न करता तेजोमय वातावरण निर्माण करणे, हेच खरे उद्दिष्ट असावे लागेल. नरकासुराच्या प्रतिमांची निर्मिती एक कला असली, तरी त्याच्या निमित्ताने उपद्रव टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सकारात्मक विचार करण्याची आवश्यकता आहे.

५. उत्सवासाठी प्रशासनाने मार्गदर्शक तत्त्वे घोषित करणे आवश्यक !

उत्सव साजरा करण्याच्या संदर्भात प्रशासनाने मार्गदर्शक तत्त्वे घोषित करणे महत्त्वाचे आहे. यावर्षी तरी त्यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना कराव्यात. पोलीस यंत्रणेनेही या संदर्भात जागरूक राहून नागरिकांना कायद्याचे पालन करण्यास प्रोत्साहित करायला हवे. तक्रार करणार्‍यांची माहिती कार्यक्रमाच्या आयोजकांना देण्याऐवजी पोलिसांनी योग्य कारवाई करून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध कठोर पावले उचलणे महत्त्वाचे आहे.

६. दिवाळी उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा !

आज गोव्याच्या लोकांनी एकत्र येऊन एक सकारात्मक संदेश देण्याची आवश्यकता आहे. उत्सव साजरा करतांना सर्वांचे हित लक्षात घेऊनच कार्यक्रम आयोजित केले जावेत. प्रशासनाने आपले कर्तव्य चोख बजावले पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळून नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना कराव्यात, ज्यामुळे गोव्याचा दिवाळी उत्सव अधिक आनंददायी आणि सुरक्षित बनू शकेल.

– श्री. नारायण नाडकर्णी, फोंडा, गोवा. (२५.१०.२०२४)