ज्ञान, अज्ञान आणि समाधान !

जगात अनेक गोष्टी आहेत की, त्यांचे ज्ञान आम्हाला नसते किंवा त्या कळत नाहीत; पण म्हणून आपण त्या गोष्टी खोट्या मानत नाही. ‘आपण आपल्या तुटपुंज्या ज्ञानाचा अभिमान धरतो’, इथे आपले चुकते. भगवंताने दिलेल्या ज्ञानाचा अभिमान धरू लागलो, तर हातातील तलवारीने शत्रूच्या शिराऐवजी स्वत:चीच मान कापल्यासारखे होईल. ज्या विद्येने स्वत:चे हित कळत नाही, ती अविद्याच होय. ‘जे खरे नाही ते खरे आहे असे वाटणे’, हे अज्ञान होय; जसे एखादा सर्परज्जूलाच अंधारामुळे साप समजतो. अविद्या आणि अज्ञान दोन्ही सारखेच घातक आहेत. ‘जी विद्या आपला घात करते, ती अविद्या होय’ आणि ‘ज्या ज्ञानाच्या अभावी आपण सुख अन् समाधान यांपासून वंचित रहातो’, ते अज्ञान होय. ‘अज्ञानात सुख असते’, असे कुणी तरी चेष्टेने म्हणतात. त्याला काही अर्थ नाही. ते मानसिक समाधान होय. ‘परमात्म्याच्या स्वरूपाविषयी आपण संशय घेतो’, हे आपले अज्ञानच होय. ‘परमात्मा आहे’, याची जाणीव आपल्याला नसते आणि परमात्म्याला जाणून घेण्याची आपली इच्छाही नसते. आपल्यात ती तळमळ नसल्यामुळे आपण त्यासाठी प्रयत्नही करत नाही; कारण आपल्यात जिज्ञासा नसते. आपण आळशी आणि नास्तिक झालो आहोत. ‘देव आपल्याला, आपल्या कृतीला पहातो’, ही जाणीव असणे, म्हणजेच ज्ञान होय’, असे गोंदवलेकर महाराज म्हणतात. ते पुढे म्हणतात, ‘पोथीतील ज्ञान कृतीत उतरवले, तर लाभ होणार. पोथी ऐकण्यासाठी पुराणिकाला पैशाच्या रूपाने मोबदला दिल्याने अपेक्षित लाभ होत नाही. ‘भगवद्भक्ती करणे’ हा खरा मोबदला आहे.’

प्रत्येकाला त्याची आवश्यकता भागेल, एवढे भगवंत देतच असतो. म्हणून आहे त्यात समाधान मानावे. एखाद्याकडे धनदौलत आणि गाड्या बंगले सर्व काही आहे; म्हणून तो समाधानी अन् आनंदी असेलच असे नाही. समाधान हे मनाच्या स्थितीवर आणि मानण्यावर अवलंबून असते. स्वार्थ आणि अपेक्षा हे दुर्गण असलेल्या व्यक्तीला समाधान कधीच मिळत नाही. त्याची हाव कधीच पूर्ण होत नाही; परंतु भगवंतावर दृढ श्रद्धा असलेला एखादा गरीब अधिक समाधानी असेल. ‘सुख आले, तर भगवंताच्या कृपेने आणि दुःख आले, तर भगवंताच्या इच्छेने’, असा त्याचा दृढ भाव असतो. ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे, त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकेल. आपली निष्ठा अशी बलवत्तर असावी की, तिच्यामुळे आपले समाधान राहील. राजा हरिश्चंद्र, भक्त प्रल्हाद यांसारख्याचा पुष्कळ छळ झाला. त्यांची दृढश्रद्धा  असल्याने ते त्या छळातून सुखरूप पार पडले. विषयात तात्कालीक सुख असते, तर भगवंताच्या अनुसंधानात शाश्वत समाधान असते. ‘भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि सर्व तोच करतो’, अशी भावना ठेवणे यासारखे दुसरे समाधान नाही !

– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.