सत्ययुग आणा ! 

लोक म्हणतात, ‘कलीयुग आले आहे’; परंतु ते आणले कुणी ? स्त्रीने लाजलज्जा सोडली. तिने पातिव्रत्याला तिलांजली दिली. पुरुष संस्कार विसरले. नात्यागोत्याचा विचार दूर पळाला. आई-वडील, भाऊ-बहीण यांना दूर करून पुरुष पत्नीचा दास झाला. वाममार्गाने पैसे मिळवण्यासाठी अवैध धंदे करू लागला. शिक्षक त्यांचा धर्म विसरले. मनुष्य माणुसकी आणि नीती विसरला. प्रत्येक जण स्वार्थाने अंधाधुंद झाला आहे. ज्याच्याकडे धनदौलत आहे, तोच शिरजोर आणि त्या ठिकाणचा राजा झाला आहे. जिथे स्वार्थ आहे तो आपला. बाकी कितीही जवळचा आणि नातेवाईक असला, तरी तो दूरचा झाला आहे. प्रामाणिक, नीतीने वागणारा आणि कर्तृत्ववान यांना इथे जगणे आता कठीण झाले आहे. हेच सर्व कलीयुग यायला कारण झाले आहे.

जेव्हा एखादा भ्रमणभाष चुकीचा ‘संकेतांक’ दिल्यावर उघडत नाही, तर चुकीच्या कर्माने भाग्याचे दरवाजे कसे उघडणार ? म्हणून जे सुख दुसर्‍याच्या दुःखाला कारणीभूत आहे, ते सर्व सोडले पाहिजे. दुसर्‍याला दुःख देऊन आपल्याला सुख मिळेल, अशी अपेक्षा कधीही करू नये. जो दुसर्‍याला सुख देतो, त्याला सुख मिळते. जो सत्य बोलतो, त्याला अनेकांचा रोष पत्करावा लागतो; परंतु एखाद्याचे दुःख बघून आपल्याला त्याच्याविषयी आपलेपणा वाटला, तर आपण योग्य मार्गावर आहोत.

कुणी तुम्हाला कितीही दुःख देवो, कुणी कितीही चुकीचे बोलो आणि तुम्हाला राग येण्यासारखी कृती करो, तुम्ही शांत रहा. आपला मान राखणारे आणि उपयोग करून घेणारे आपल्याला शोधत येतील. कच्च्या मातीचे घर आहे; म्हणून दुर्लक्ष करून नाते तोडू नका. मातीची पकड मजबूत असल्याने ती आपल्याला धरून ठेवते; मात्र संगमरवराच्या लादीवरून आपला पाय घसरण्याची भीती अधिक असते. रुपयाचे अवमूल्यन होत असते, हे आपण पहातो; परंतु ‘मनुष्याचे रुपयासाठी होणारे अवमूल्यन त्यापेक्षा अधिक आहे’, हेच अनुभवाला येते. झाडाला केवळ वृक्ष समजू नका, गायीला केवळ पशू समजू नका आणि आई-वडिलांना केवळ मनुष्य समजू नका; कारण ही तीनही साक्षात् ईश्वराची रूपे आहेत. यांच्यामुळे सत्ययुग पुन्हा येईल.

कलियुगातही जन्म-मरणाचा फेरा चुकवण्याची सहज आणि सुलभ साधने भगवंताने उपलब्ध करून दिली आहेत. त्यासाठी पूर्वीसारखी घोर तपश्चर्या करण्याची आवश्यकता नाही. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले आहे, ‘सर्व सोडून दे. अनन्यभावाने भावाने मला शरण येऊन माझा भक्त हो. माझ्या अनुसंधानात रहा.’ असे केले, तर या घोर कलियुगात मनुष्य सत्ययुग अनुभवल्याविना रहाणार नाही !

– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.