सध्या ‘पैसा’ हा जीवनाचा मूलाधार झाला आहे. त्यामुळे ‘मुलांनी अधिक कमाई करणे, सुखनैव जीवन जगणे, म्हणजे जीवनाची सार्थकता’, असे समीकरण झाले आहे. त्यासाठी चांगल्या वेतनाची नोकरी अपरिहार्य ठरते. त्यासाठी चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी स्पर्धा चालू होते. लक्षावधी रुपयांचे शुल्क भरून खासगी शिकवणीवर्ग लावले जातात. काही ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनेच शिकवणीवर्गात अभ्यास करून घेतला जातो. त्या वेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उपस्थित राहिले नाही, तरी चालते. बहुतेक तसा अलिखित करार त्यांच्यामध्ये झालेला असतो. अधिक गुण मिळवण्यासाठी पालकांकडून मुलांवर दबाव टाकण्याचाही भाग होतो. त्यामुळे त्यांना ताण येतो. काही वेळा मुले अनेक खटपटी-लटपटी करून, देणगी आणि वशीला लावून महाविद्यालयात प्रवेश मिळवतात. अभियांत्रिकी किंवा आधुनिक वैद्य यांसारखी पदवी मिळवून पुढे नोकरीच्या संधी शोधतात. चांगले सुखी जीवन जगण्यासाठी केवळ पैसा आवश्यक आहे, असे गृहित धरल्यामुळे ‘पुष्कळ शिका, अधिकाधिक गुण मिळवा, नोकरी शोधा’, यांमागे तरुण पिढी धावत आहे. त्यासाठी आई-वडील ऐपत नसतांनाही कर्ज काढून, घर-भूमी गहाण टाकून पैसा उभा करतात. एवढे करून मुलाने काही तरी कर्तृत्व करून दाखवले, तर ठीक, अन्यथा ‘तेल गेले आणि तूपही गेले’, असे म्हणण्याची पाळी पालकांवर येते.
केवळ पैसे मिळवणे, हेच जीवनाचे सर्वस्व नाही. अधिक पैसे मिळाले, म्हणजे उत्तम आणि सुखी जीवन जगायला मिळेल, असे नाही. ज्यांच्याकडे पुष्कळ पैसा आहे, त्यांना ‘तुम्ही सुखी आणि समाधानाचे जीवन जगत आहात का ?’, असे विचारल्यावर त्यांच्याकडून नकारात्मक उत्तर येते, म्हणजे सुखी आणि समाधानी जीवनासाठी पुष्कळ पैसा मिळवणे, हे प्रथम प्राधान्य नाही, हे लक्षात घ्यायला हवे. मध्यम बुद्धीची किंवा अल्पक्षमतेच्या बुद्धीची मुलेही वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये प्राप्त करून चांगले आयुष्य जगू शकतात. त्यामुळे पालकांनी मुलांवर चांगले गुण मिळवण्यासाठी दबाव आणू नये. समाजाची गुणस्पर्धेची आणि ‘पैसा हेच सर्वस्व’ अशी झालेली ही धारणा पालटणे आवश्यक आहे. त्याग, नीतीमत्ता, प्रेमभाव यांचे संस्कार, जीवनात आध्यात्मिक उन्नती करणे आणि समाजातील गरजूंना साहाय्य करणे, अशा अनेक गोष्टी जीवन जगतांना आत्मसात् करायला हव्यात. मुलांना धर्माचरणी आणि परोपकारी बनवून भगवंताच्या अनुसंधानात रहायला शिकवले, तर माणूस म्हणून जगण्याचा सर्व भार भगवंत उचलणार आहे, अशी श्रद्धा त्यांच्या मनात निर्माण करणे, हे पालकांचे प्रथम कर्तव्य आहे. ‘चांगले जीवन जगण्या’च्या सुसंस्कारांचे धडे मुलांना दिले, तर ती खर्या अर्थाने सुखी होतील !
– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.