पुणे – नवरात्र, दसरा या उत्सवकाळात अन्न आणि औषध प्रशासनाने भेसळ करणार्यांवर धडक मोहीम राबवली होती. त्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ७ लाख रुपये, तर पुणे विभागात ३ लाख ३४ सहस्र रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला. पुणे विभागामध्ये अन्न आस्थापनाच्या २८ पडताळण्या करण्यात आल्या असून अन्न आस्थापनांमधून दूध, खवा, पनीर, गोड मावा, तूप, बटर आणि नमकीन इत्यादी अन्नपदार्थांचे एकूण १५ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. संशयावरून विविध अन्नपदार्थांच्या दुकानात धाडी घालून माल जप्त केला. पुणे जिल्हा आणि पुणे विभागात मिळून १० लाख ३५ सहस्र ३७८ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. (जप्त न करण्यात आलेला माल किती असेल ? याची कल्पना करता येत नाही. प्रशासन भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कधी काढणार ? – संपादक) गणेशोत्सवात १४ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता. ‘अन्न सुरक्षा आणि मानदे कायदा २००६ नियमन’ अन्वये ही कारवाई करण्यात आली.