पोलिसांनी अन्वेषणाला सहकार्य न केल्याने सत्र न्यायालयाने प्रा. वेलिंगकर यांचा अटकपूर्व जामीन नाकारला

प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी फ्रान्सिस झेवियरबद्दल विधान केल्याचे प्रकरण

पणजी, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ (‘डी.एन्.ए.’ (डीऑक्सीरिबो न्यूक्लिक ॲसिड’) म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक) चाचणी करून या शवाविषयी असलेला जुना वाद संपुष्टात आणण्याची मागणी हिंदु महारक्षा आघाडीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली होती. डिचोली पोलिसांनी प्रा. वेलिंगकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद केल्यानंतर प्रा. वेलिंगकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पणजी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बॉस्को रॉबर्ट यांनी ७ ऑक्टोबर या दिवशी रात्री ९ वाजता प्रा. वेलिंगकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

अतिरिक्त सत्र न्यायालयाने कोणत्या कारणासाठी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, याविषयी सर्वांमध्ये उत्सुकता होती. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळतांना न्यायालय आदेशात म्हणाले, ‘‘डिचोली पोलिसांनी प्रा. वेलिंगकर यांना भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५ (३) अंतर्गत २ ‘समन्स’ बजावले होते. प्रा. वेलिंगकर यांनी पोलिसांचे ‘समन्स’ न चुकवता अन्वेषणाला सहकार्य करायला पाहिजे होते.’’

प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने काहीच बोलू शकत नाही ! – खासदार सदानंद शेट तानावडे

प्रा. वेलिंगकर यांच्यासंबंधीचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने मी  त्यासंबंधी कोणतेही विधान करणार नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी ८ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी पणजी येथे एका पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केले.