वीर सावरकर यांच्या अपकीर्तीचे प्रकरण
पुणे – येथील न्यायालयाने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांची अपकीर्ती केल्याप्रकरणी समन्स बजावले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात फौजदारी खटला नोंद केला होता. वर्ष २००३ मध्ये इंग्लंड दौर्यात राहुल गांधींनी हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीच्या संदर्भात अपकीर्तीकारक विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला होता, तसेच वर्ष २०२३ मध्ये इंग्लंड येथे केलेल्या भाषणामध्येही राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्या संदर्भात अपमानकारक विधान केल्याचा आरोप सात्यकी सावरकर यांनी केला. २३ ऑक्टोबर या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्याचे आदेश राहुल गांधींना दिले आहेत. राहुल गांधी यांनी वापरलेल्या शब्दांमुळे सावरकर कुटुंबियांना मानसिक त्रास झाला. त्यामुळे राहुल गांधींवर कायदेशीर खटला चालवून त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी आणि त्यांच्याकडून अब्रुनुकसानीविषयी भरपाईही मिळावी, असे सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींवर आरोप करतांना म्हटले आहे.