मुंबई – ‘अहमदनगर’ जिल्ह्याच्या ‘अहिल्यानगर’ या नामांतराला केंद्रशासनाने मान्यता दिली आहे. ४ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याविषयी अधिकृत घोषणा करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर येथे गेले असतांना काही मुसलमान नागरिकांनी ‘अहमदनगर’ नावाच्या घोषणा देत जिल्ह्याच्या ‘अहिल्यानगर’ नामांतराला विरोध दर्शवला होता. वर्ष २०२४ हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे ३०० वे वर्ष आहे. याचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘अहमदनगर’ जिल्ह्याचे ‘अहिल्यानगर’, असे नामांतर करण्यात येत असल्याची घोषणा केली होती. याविषयी महाराष्ट्र शासनाकडून केंद्रशासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यापूर्वी रेल्वे मंत्रालयाने ‘अहिल्यानगर’ नामांतराला कोणताही आक्षेप नसल्याचे राज्यशासनाला कळवले आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याविषयी ‘महायुती सरकारने दिलेल्या वचनाची पूर्ती केली’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.