‘लहानपणी साधारण ७ वर्षे मी तबला शिकलो. या कालावधीत पुष्कळ थंडी, पाऊस अथवा उकाडा असला, तरी मी नियमित तबला शिकण्यास जायचो. तबला-वादनातून मला फारसा आनंद मिळत नव्हता, तरी मी शिकत होतो. या कालावधीत माझ्या मनात प्रश्न आला, ‘मला तबला वादनातून आनंद मिळत नाही, तरी मी का शिकत आहे ?’ तेव्हा मला ‘याचे कारण पुढे कळेल’, असे कुणीतरी सूक्ष्मातून सांगितले. हा प्रसंग घडला, तेव्हा मी लहान असून सनातन संस्थेच्या संपर्कात आलो नव्हतो. अनेक वर्षांनंतर तबला शिकण्याचे आध्यात्मिक लाभ पुढीलप्रमाणे लक्षात आले.
१. वर्ष २०१६ पासून मला सूक्ष्मातून विविध विषयांवर ज्ञान मिळू लागले. या ज्ञानाचा प्रारंभ ‘संगीत’ या विषयापासून झाला. तबला शिकतांना त्याच्या तात्त्विक आणि प्रायोगिक भागांचे ज्ञान झाल्याने त्याच्या आधारे मला संगीतातील विविध सूक्ष्म पैलूंचा अभ्यास करणे सुलभ झाले.
२. फेब्रुवारी २०२० मध्ये ‘तबल्यातील एकेका शब्दाच्या नादाचा सूक्ष्मातून काय परिणाम होतो ?, तबल्याद्वारे भूलोक, भुवर्लाेक, स्वर्गलोक, महर्लाेक, जनलोक आणि तपोलोक येथे ऐकू येणारे सूक्ष्म नाद कसे व्यक्त करता येतील ?’, यांचा अभ्यास केल्यावर विविध पैलूंचे सूक्ष्म ज्ञान प्राप्त झाले.
३. आतापर्यंतच्या तबलजींनी तबल्याद्वारे शंख, डमरू इत्यादी ठराविक आध्यात्मिक नाद काढले आहेत; पण ‘पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांशी संबंधित नाद तबल्यातून कसे काढायचे ?’, यांचे मला ईश्वरी कृपेमुळे सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त झाले.
४. तबल्याद्वारे वरीलप्रमाणे ‘दैवी नादांची निर्मिती’, हा विश्वातील कदाचित पहिला सूक्ष्म अभ्यास असेल, जो गुरुकृपेने मला करता येत आहे. या सूत्रांचा अभ्यास करतांना लहानपणी तबला शिकण्याविषयी जो प्रश्न निर्माण झाला आणि त्या वेळी सूक्ष्मातून मला कुणीतरी ‘याचे कारण पुढे कळेल’, असे सांगितले. हे सांगणारा देवच होता अन् ‘देवाला संगीतविषयक सूक्ष्म अभ्यास अपेक्षित असल्याने तबला नियमित शिकण्याची प्रेरणा तो मला देत होता’, हे लक्षात आले.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|