१. कु. भक्तीची सात्त्विक वेशभूषा पाहून तिच्या शिक्षिकेने तिला शाळेतील सर्व वर्गांत नेऊन विद्यार्थ्यांना तिच्याप्रमाणे आदर्श वेशभूषा करून येण्यास सांगणे
‘कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी कु. भक्ती रोहन मेहता (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ५७ टक्के, वय १२ वर्षे) शिक्षिकांनी सांगितल्याप्रमाणे राधेसारखी वेशभूषा आणि दागिने घालून शाळेत गेली होती. शाळेतून घरी आल्यावर भक्ती मला म्हणाली, ‘‘शाळेत इतर मुलीही वेशभूषा करून आल्या होत्या; परंतु त्यांचे कपडे तोकडे होते आणि सात्त्विकही नव्हते. त्यांनी केस मोकळे सोडले होते. त्यांनी पुष्कळ सौंदर्यवर्धन (मेकअप) केले होते. आपण आश्रमात जशी सात्त्विक वेशभूषा करतो, तशी माझी वेशभूषा होती. त्यामुळे शिक्षिकेला माझी वेशभूषा पुष्कळ आवडली आणि त्यांनी मला मुख्याध्यापकांकडे नेले. त्यानंतर त्यांनी मला प्रत्येक वर्गामध्ये नेऊन मी केल्याप्रमाणेच ‘आदर्श वेशभूषा करून सर्वांनी शाळेत यावे’, असे सगळ्यांना सांगितले.’’
२. ‘सात्त्विक वेश घालणे’ हा एक प्रकारे हिंदु संस्कृतीचा प्रसारच असल्याचे लक्षात येणे
कु. भक्तीच्या अनुभूतीवरून मला शिकायला मिळाले, ‘हल्लीची पिढी कुसंस्कृतीच्या दिशेने चालली आहे. अशात आपण सात्त्विक वेश घातला, तर लोक सात्त्विकतेकडे नक्कीच आकर्षित होतात. त्यामुळे आपण नेहमी आदर्श आणि सात्त्विक वेशभूषा करायला हवी. हाही एक प्रकारे आपल्या हिंदु संस्कृतीचा प्रसारच आहे.’
३. कृतज्ञता
गुरुदेवांनी आम्हाला सात्त्विकतेचे महत्त्व, सात्त्विक पद्धतीने केशरचना आणि सात्त्विक वेशभूषा यांबद्दलचे ज्ञान दिले आहे. त्यामुळेच आज आमच्या जीवनात सात्त्विकता आहे; म्हणून ते आम्ही आमच्या मुलांना शिकवू शकतो आणि मुलेही ती अनुभूती घेऊ शकत आहेत. त्यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
४. प्रार्थना
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा अशीच सदैव आमच्यावर राहू दे’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.
– सौ. प्राची रोहन मेहता (वय ४० वर्षे) फोंडा, गोवा. (४.२.२०२४)