संपादकीय : इस्रायल नावाचा बाजीगर !

इस्राइलचा झेंडा

हारकर जितनेवाले को बाजीगर कहते है’, हा ९० च्या दशकातील ‘बाजीगर’ या हिंदी चित्रपटातील अत्यंत गाजलेला ‘डायलॉग’ आजही अनेकांना आठवत असेल. त्या वेळी ज्याच्या-त्याच्या तोंडी तो असायचा. अर्थात् त्या चित्रपटातील ‘बाजीगर’ हा काल्पनिक होता; पण असा खराखुरा आणि वास्तवातील ‘बाजीगर’ संपूर्ण जगाने ‘याचि देही याचि डोळा’ पाहिला. या बाजीगरचे नाव आहे इस्रायल ! इस्रायलने ‘हिजबुल्ला’च्या आतंकवाद्यांवर केलेले आक्रमण संपूर्ण जगाला तोंडात बोट घालायला लावणार होते. ते खरोखरच अकल्पनीय आणि अवर्णनीय असेच होते. इस्रायलने आतंकवाद्यांकडील ‘पेजर’मध्ये स्फोट घडवून आणून त्यांना ठार मारले. एकाच वेळी शेकडो ‘पेजर’मध्ये अचानक झालेल्या स्फोटांमुळे आतंकवादी जर्जर झाले. या आक्रमणात अनेक आतंकवादी ठार झाले, तर ५०० हून अधिक आतंकवाद्यांना त्यांचे डोळे गमवावे लागले. शत्रूच्या पापण्या लवायच्या आत विध्वंस करायचा असतो, तरच शत्रूच्या हृदयात धडकी भरते; परंतु इस्रायलच्या आक्रमणाने शत्रूला पापण्या लवायचीही संधी दिली नाही आणि काही कळायच्या आतच शत्रूच्या पापण्यांसह डोळे आणि हृदयाच्या चिंधड्या उडाल्या ! युद्धात विजयी व्हायचे असेल, तर शत्रूचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असते. तो करून योग्य रणनीती आणि त्याची अचूक कार्यवाही केली, तर विजय ठरलेला असतो, हे इस्रायलने जगाला कृतीतून दाखवून दिले.

हे आक्रमण इस्रायलच्या ‘युनिट-८२००’ या यंत्रणेने केल्याचे म्हटले जात आहे, तरी त्यामागील डोके हे ‘मोसाद’ या जगविख्यात गुप्तचर यंत्रणेचेच आहे, असा कयास आहे. गेल्या वर्षी ‘हमास’ या जिहादी आतंकवादी संघटनेने याच ‘मोसाद’च्या हलगर्जीपणाचा अपलाभ उठवत इस्रायलवर मोठे आक्रमण केले होते. तेव्हा जगाने इस्रायलला अणि विशेषतः मोसादला पराभवाच्या छायेत लोटले. त्यातून सावरून मोसाद आधी ‘हमास’च्या प्रमुखाचा आणि आता कित्येक आतंकवाद्यांचा कर्दनकाळ बनला; म्हणून तो बाजीगर ! आजचा काळ हा हातात बंदुका, तोफा, रणगाडे आदी घेऊन लढण्याचा राहिलेला नाही. शत्रूला नामोहरम करण्याची नानाविध माध्यमे कालौघात निर्माण झाली आहेत. त्याचा अचूक अभ्यास आणि देशहितासाठी वापर करण्याची आवश्यकता आहे. ‘युद्ध हे शत्रूच्या भूमीवर लढायचे असते’, हा युद्धाचा सर्वसाधारण नियम आहे; मात्र इस्रायलने त्याच्या अकल्पनीय आक्रमणाद्वारे ही व्याख्याच आता पूर्णपणे पालटून टाकली आहे. ‘शत्रूच्या हातातील पेजर, हीसुद्धा रणभूमी होऊ शकते आणि त्याच रणभूमीत शत्रूला गाडता येऊ शकते’, हे इस्रायलने दाखवून दिले. याला खर्‍या अर्थाने ‘मास्टरस्ट्रोक’ म्हणतात आणि तो केवळ ‘मोसाद’च देऊ शकतो. या आक्रमणाद्वारे ‘मोसाद’ने त्याच्यावरील निष्क्रीयतेचा डाग पुसून काढत जगभरातील टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

भारताने बोध घ्यावा !

भारताला चीन, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव आदी देशांपासून धोका आहे

प्राबल्य सिद्ध करण्यासाठी आधी पराक्रम दाखवावा लागतो. भारतानेही असा पराक्रम वेळोवेळी दाखवला आहे. अत्यंत बिकट आणि कठीण अशा कारगिल युद्धात आपण शत्रूच्या तोंडातून विजय खेचून आणला आहे. काही वर्षांपूर्वी आतंकवाद्यांच्या भूमीत घुसून ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून आपण आपली क्षमता सिद्ध केली आहे. तथापि असा पराक्रम गाजवण्याच्या अगणित संधी अजून आपल्याला उपलब्ध आहेत. भारताला चीन, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव आदी देशांपासून धोका आहेच; पण देशांतर्गत जम्मू-काश्मीर, पंजाब, बंगाल, केरळ आदी राज्यांचे लचके तोडायला जिहादी लांडगे सरसावले आहेत. या जिहाद्यांना त्यांच्या स्वर्गापर्यंत पोचवण्याचा पराक्रम भारताला आज ना उद्या दाखवावा लागणार आहे. या सर्वांच्या संदर्भात मात्र भारत कठोर असल्याचे आज तरी दिसत नाही. भारतात आतंकवाद्यांचा उदो उदो करणार्‍या जे.एन्.यू. आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठ यांसारख्या शिक्षण संस्थांपासून, आपली संपूर्ण व्यवस्थाच पोखरू पहाणार्‍या साम्यवाद्यांपर्यंत, तसेच जात्यंध अन् अल्पसंख्यांकप्रेमी काँग्रेससारख्या पक्षांपासून ते विध्वंसक अशा शहरी नक्षलवाद्यांपर्यंत, सर्व जण अप्रत्यक्षपणे ‘हमास’ किंवा ‘हिजबुल्ला’ यांच्यासारखीच भूमिका बजावत आहेत. म्हणून भारताची अवस्था इस्रायलपेक्षा अधिक बिकट आहे; कारण शत्रू केवळ सीमेच्या बाहेर नाही, तर नागरिकांच्या अवती-भोवतीच आहे. या सर्वांच्या जोखडातून देश मुक्त करण्यासाठी आपल्याला ‘इस्रायली बाणा’ अंगीकारण्याविना दुसरा पर्याय नाही. छोटासा इस्रायल इस्लामी देशांच्या गराड्यात रहातो. ‘३२ दातांत जीभ रहावी’, अशी त्याची अवस्था आहे. तरीही आज तो इस्लामी आतंकवाद्यांचे दात घशात घालतांना दिसत आहे. आजपर्यंत इस्रायलचे खच्चीकरण करण्याचे काही अल्प प्रयत्न झाले नाहीत; पण त्या सर्वांना इस्रायल पुरून उरला. एवढेच नाही, तर त्यात तो टिकला आणि वाढला; कारण इस्रायली नागरिकांतील एकी आणि प्रखर राष्ट्रभक्ती ! इस्रायलचा बाणेदारपणाचे मूळ या प्रखर राष्ट्रभक्तीत आहे.

चिनी भ्रमणभाषपासून सावध रहा !

चिनी भ्रमणभाष

जसा इस्रायलने ‘पेजर’चा वापर करून शत्रूचा विध्वंस घडवून आणला, तसाच प्रयत्न उद्या चीनही भारताच्या संदर्भात करू शकतो. भारतात आज अनेक चिनी भ्रमणभाष आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्तात उपलब्ध आहेत. त्यांचे तंत्रज्ञान चिनी आहे. त्यामुळे उद्या चीनच्या डोक्यात किडा वळवळणार नाही, असे आपण म्हणू शकत नाही. यासाठी भारताने चिनी मालावर देशात बहिष्कार घालावा आणि समर्थांनी सांगितल्याप्रमाणे अखंड सावधानता बाळगावी !

भारताला पराक्रमाचा वारसा !

इस्रायलने काल शत्रूला आणि जगाला जसे चकीत केले, तसे आपल्याकडेही छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून, तसेच आग्य्राहून स्वतःची सुखरूप सुटका करून यापूर्वीच चकित केले आहे. हा इतिहास आज हळूहळू कालबाह्य ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अफझलखानाचा कोथळा बाहेर काढतांनाचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र आणि फलक आपण आज सार्वजनिकपणे लावू शकत नाही ! लांगूलचालनाचा हा परिपाक भारताची अतोनात हानी करणारा आहे. याउलट छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धकला आणि युद्धकौशल्य यांवर विदेशात अभ्यासक्रम आहे. उद्या जर इस्रायलच्या वरील अकल्पनीय आक्रमणाच्या संकल्पनेचे मूळ इस्रायलने या अभ्यासक्रमातून घेतल्याचे उघड झाले, तर आश्चर्य वाटू नये. छत्रपतींचा वारसा भारताने पुढे चालवावा, अशीच राष्ट्रप्रेमी भारतियांची इच्छा आहे.

भारताला बाह्य शत्रूंसह अंतर्गत शत्रूंचा बीमोड करण्यासाठी ‘इस्रायली बाणा’ अंगीकारण्याला पर्याय नाही !